हनी ट्रॅपमधील साखळी टोळी जेरबंद 
सांगली

Phaltan Honey Trap Case : हनी ट्रॅपमधील साखळी टोळी जेरबंद

महिलेसह दहाजणांना अटक

पुढारी वृत्तसेवा

फलटण : फलटण येथे प्रेमसंबंधाचे आमिष दाखवत (हनी ट्रॅप) हॉटेल व्यावसायिकाला जाळ्यात ओढून तब्बल 40 लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या साखळी टोळीचा पर्दाफाश करण्यात फलटण शहर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात एका महिलेसह दहाजणांना अटक करण्यात आली असून, 29 लाखांहून अधिक रोख रक्कम, वाहने आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

साहिल रवी तारे (रा. दत्तनगर फलटण), वैभव बाळासो सस्ते (रा. सस्तेवाडी फलटण), रोहन नवीन काकडे (रा. मंगळवार पेठ, फलटण), विनायक बाळासो जाधव (रा. ठाकुरकी, फलटण) राज राम बोके (रा. मंगळवार पेठ, फलटण), विजय दत्तू ननवरे (रा.झिरपे गल्ली मंगळवार पेठ, फलटण) तुषार ऊर्फ गद्या संजय ननवरे (रा. झिरपेगल्ली मंगळवार पेठ, फलटण), सागर ऊर्फ टक्या मोहन साळुंखे (रा. वीर, ता. पुरंदर, जि. पुणे), राहुल रामचंद्र जगताप (रा. कसबा पेठ जबरेश्वर मंदिराजवळ फलटण) व एक महिला अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व्यावसायिकास सोशल मीडियावर ‌‘हाय‌’असा मेसेज पाठवून महिलेने संवाद सुरू केला. त्यानंतर मोबाईलवरुन संपर्क वाढवत विश्वास संपादन करण्यात आला. काही दिवसांतच संबंधितांना फलटण येथे बोलावून हॉटेलमध्ये नेण्यात आले. हॉटेलमध्ये अश्लील बोलून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत व्यावसायिकास मारहाण करण्यात आली आणि 40 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. प्राथमिक तपासात काही रक्कम रोख तसेच एटीएम व इतर माध्यमांतून उकळल्याचे समोर आले आहे. दरम्यान, फिर्यादी पुण्याकडे परतत असताना रस्त्यात वाहन अडवून त्यांच्याकडील सोन्याची साखळी जबरदस्तीने काढून घेण्यात आल्याची तक्रार आहे. घटनेनंतर पीडिताने तात्काळ पोलिसांत धाव घेतली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून सापळा रचला. विविध ठिकाणी छापे टाकत संशयितांना अटक केली. संशयितांकडून 29 लाखांहून अधिक रक्कम, गुन्ह्यात वापरलेली वाहने व मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी संपर्क ठेवताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलिस अधिकारी रणजीत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अरविंद काळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन शिंदे, पोलिस उपनिरीक्षक दिनेश शिंदे व त्यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT