सांगली : येथील दत्त-मारुती रस्त्यावर दुकानासमोरील मंडप हटविण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाशी झालेल्या वादावादीत एका व्यापाऱ्याने सहायक आयुक्त तथा अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधीक्षक सचिन सागावकर यांच्या अंगावर पेट्रोल ओतले, तसेच स्वतःच्या अंगावरही पेट्रोल ओतून घेतल्याने मोठा तणाव निर्माण झाला. अधिकारी व दोन-तीन व्यापाऱ्यांत झटापट झाली. अखेर महापालिकेने जेसीबीच्या साहाय्याने हा मंडप हटवला. संबंधित व्यापाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी शहर पोलिस ठाण्यात अर्ज देण्यात आला आहे.
दरम्यान, मदनभाऊ व्यापारी संकुलासमोरील पार्किंग जागेतील कपड्यांच्या बाजारावरूनही जोरदार वाद झाला. हा कापड बाजार काल, शनिवारपुरता कायम ठेवत आज, रविवारपासून या विक्रेत्यांना वैरण बाजारात स्थलांतरित होण्याचे निर्देश देण्यात आले.
दिवाळीच्या खरेदीसाठी सांगली शहरातील कापड पेठ, मदनभाऊ व्यापारी संकुलासमोरील पार्किंग परिसर, सांगली सिटी पोलिस ठाण्यासमोरील परिसर, राजवाडा चौक आणि स्टेशन रोड येथे कापड तसेच अन्य दिवाळी साहित्य विक्रेत्यांकडून तात्पुरते स्टॉल उभारले जातात. या ठिकाणी खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे यंदा महापालिका प्रशासनाने तरुण भारत स्टेडियमसमोरील वैरण बाजार परिसरात या कपड्यांच्या दिवाळी बाजारासाठी जागा निश्चित केली आहे. मात्र प्रशासनाने स्वतंत्र जागा उपलब्ध करून दिल्यानंतरही अनेक कपडे विक्रेते वैरण बाजाराकडे फिरकले नाहीत. त्यांनी शहर पोलिस ठाण्याजवळील मदनभाऊ व्यापारी संकुलासमोरील पार्किंगच्या जागेतच सध्या त्यांनी कपड्यांचा बाजार मांडला होता. दुसरीकडे, दत्त-मारुती रस्त्यावर दुकानांसमोर पाच फूट अंतरात तात्पुरते स्टॉल उभारण्यास महापालिकेने परवानगी दिली होती. मात्र, स्टॉलवर मंडप किंवा शेड उभारण्यास मनाई केली होती. तरीही काहींनी स्टॉलवर मंडप, शेड उभारले होते.
या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास उपायुक्त अश्विनी पाटील तसेच अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाचे अधीक्षक तथा सहायक आयुक्त सचिन सागावकर, सहायक आयुक्त ऐश्वर्या माने यांनी दत्त-मारुती रस्त्यावर पाहणी केली. यावेळी स्वच्छता विभागप्रमुख याकुब मद्रासी, प्रभाग समिती क्रमांक एकचे अधीक्षक माणिक गोंधळे, स्वच्छता अधिकारी अतुल आठवले, प्रणील कांबळे तसेच अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी होते.
पाहणीदरम्यान तीन ठिकाणी स्टॉलवर मंडप उभारल्याचे निदर्शनास आले. अधिकाऱ्यांनी संबंधित व्यापाऱ्यांना मंडप काढून घेण्याच्या सूचना दिल्या. मात्र, लोकप्रतिनिधींशी चर्चा झाली असून मंडप उभारण्यास संमती मिळाल्याचा दावा काही व्यापाऱ्यांनी केला. त्यावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केवळ स्टॉल उभारण्यास परवानगी दिली असून मंडप किंवा शेड उभारण्यास कोणतीही परवानगी दिलेली नाही, असे स्पष्ट केले. मंडप स्वतःहून काढून घ्या, अन्यथा महापालिका प्रशासन तो हटवेल, असा पवित्राही स्पष्ट केला.
न्यू दिनेश दुकानासमोर मंडप, शेडवरून व्यापारी आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. याचवेळी एका व्यापाऱ्याने बाटलीतून आणलेले पेट्रोल सहायक आयुक्त सचिन सागावकर यांच्या अंगावर ओतले. त्यानंतर स्वतःच्या अंगावरही पेट्रोल ओतून घेतले. या अनपेक्षित प्रकारामुळे घटनास्थळी एकच खळबळ उडाली. महापालिका अधिकारी आणि कर्मचारी संतप्त झाले. परिस्थिती तणावपूर्ण बनल्याने बेकायदेशीरपणे उभारलेला मंडप हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर महापालिकेच्या पथकाने जेसीबीच्या साहाय्याने मंडप हटविला.
संबंधित व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल होणार
सहायक आयुक्त सचिन सागावकर म्हणाले, दत्त-मारुती रोडवर काही व्यापाऱ्यांनी सूचनांचे उल्लंघन करून मंडप आणि शेड उभारले होते. न्यू दिनेश दुकानासमोरील मंडप, शेड काढण्यास सांगितल्यानंतर संबंधित दुकानदाराने माझ्या अंगावर पेट्रोल ओतले आणि स्वतःच्या अंगावरही पेट्रोल ओतून घेतले. हा प्रकार गंभीर असून अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या निर्देशानुसार संबंधित व्यापाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी शहर पोलिस ठाण्यात अर्ज दिला आहे.