ईश्वरपूर : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या पेठ ते कागलदरम्यानचे सहापदरीकरणाचे काम गेल्या वर्षभरापासून ठप्प आहे. परिणामी महामार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून अपघातांचा धोका कमालीचा वाढला आहे. यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सप्टेंबर २०२२ पासून पुणे-बंगळुरू महामार्गाच्या सहापदरीकरण कामास सुरुवात झाली. मार्च २०२६ पर्यंत हे काम पूर्ण करण्याची मुदत होती. सातारा जिल्ह्यातील शेंद्रे ते सांगली जिल्ह्यातील पेठनाका आणि पेठनाका ते कोल्हापूर जिल्ह्यातील कागल अशा दोन टप्प्यांत हे काम केले जात आहे. दोन्ही टप्प्यांतील मुख्य ठेकेदार कंपन्यांनी उपठेकेदार नेमले आहेत. मात्र, मुख्य ठेकेदार आणि उपठेकेदारांत समन्वय नसल्याने काम कासवगतीने सुरू आहे. सातारा ते पेठनाक्यापर्यंतचे काम गतीने सुरू असले, तरी पेठनाका ते कागल या टप्प्यातील काम गेल्या अनेक महिन्यांपासून ठप्प असून यंत्रसामग्री जागीच थांबून आहे.
काम रखडले; अपघात वाढले
या मार्गाचे काम रखडल्याने ठिकठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मुख्य रस्त्यासह सेवा रस्त्यावरही मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी खड्ड्यांत पाणी साचल्याने वाहनचालकांना खोलीचा अंदाज येत नाही. परिणामी दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटना रोज घडत आहेत. ज्या ठिकाणी रस्ता वळवण्यात आला आहे, तिथे अपघात अधिक होत आहेत. शिवाय उड्डाण पुलांची कामे रखडल्याने वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे.
या महामार्गावरून रोज हजारो लहान-मोठी तसेच अवजड वाहने धावतात. मात्र, अर्धवट कामामुळे रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. पावसामुळे खड्डे वाढल्याने वाहतुकीचा वेग मंदावला असून प्रवासाचा वेळ वाढला आहे. सोबतच वाहनांचे नुकसान होत असल्याने चालकांना आर्थिक फटका बसत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हे काम तातडीने सुरू करून खड्डे बुजवावेत, अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे.