मिरज : पाटगाव (ता. मिरज) येथे बालविवाह केल्याप्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ग्रामसेवक विनायक दिलीपकुमार मोरे यांनी पती तेजस अशोक कांबळे, लता अशोक कांबळे (दोघे रा. भोसे), सचिन महादेव कांबळे आणि मेघा सचिन कांबळे (दोघे रा. संजयनगर, सांगली) यांच्याविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
16 वर्षीय तरुणीचा तेजस अशोक कांबळे याच्यासोबत पाटगावमधील एका मंदिरात दि. 7 रोजी दुपारी 12 वाजता विवाह पार पडला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर ग्रामसेवक विनायक मोरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी तरुणी ही अल्पवयीन आहे, हे माहीत असतानाही विवाह करण्यात आला. याप्रकरणी तेजस कांबळे याच्यासह चौघांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.