पुलाचे एकाचवेळी दोनदा लोकार्पण 
सांगली

Sangli News : पुलाचे एकाचवेळी दोनदा लोकार्पण

‘आयर्विन’ला समांतर पुलाची कथा ः आधी जिल्हाधिकारी, नंतर पालकमंत्री पाटील यांनी केले उद्घाटन

पुढारी वृत्तसेवा

सांगली : आयर्विन पुलाला समांतर पुलाचे गुरुवारी सायंकाळी दहा मिनिटांच्या फरकाने दोनदा लोकार्पण झाले. आधी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याहस्ते व आयुक्त, पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले. त्यानंतर दहाच मिनिटांनी पालकमंत्री यांच्या उपस्थितीत आमदार सुधीर गाडगीळ व आमदार सुरेश खाडे यांनी नारळ फोडून समांतर पुलाचे लोकार्पण केले. नगरपालिका निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी दोनदा पुलाच्या लोकार्पणाचे फिक्सिंग घडवून आणले.

लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते गुरुवारी सायंकाळी पाच वाजता आयोजिले होते. याबाबत शहरभर जाहिरात केली होती. त्यामुळे सायंकाळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. पालकमंत्री पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे यांची प्रतीक्षा सुरू होती. तेवढ्यात जिल्हाधिकारी अशोक काकडे आले. आयुक्त सत्यम गांधी, पोलिस अधीक्षक संदीप घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडेही उपस्थित झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर आधीच उपस्थित होते. जिल्हाधिकारी, आयुक्त, पोलिस अधीक्षकांनी नारळ फोडला व फीत कापून पुलाचे लोकार्पण केले. यावेळी भाजपचे युवा नेते सिद्धार्थ गाडगीळ, भाजचे शहर जिल्हाध्यक्ष विश्वजित पाटीलही उपस्थित होते. त्यानंतर सर्व प्रशासकीय अधिकारी पुलावरून चालत सांगलीवाडीच्या दिशेने गेले.

त्यानंतर लगेचच आमदार गाडगीळ, आमदार खाडे उपस्थित झाले. माजी आमदार दिनकर पाटील, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, भाजप नेते पृथ्वीराज पाटील, भाजपचे युवा नेते सिद्धार्थ गाडगीळ, विश्वजित पाटील, अजिंक्य पाटील, विलास शिंदे व कार्यकर्ते उपस्थित होते. थोड्याच वेळात पालकमंत्री पाटील उपस्थित झाले. त्यानंतर आ. गाडगीळ व आ. खाडे यांच्याहस्ते नारळ फोडून समांतर पुलाचे लोकार्पण झाले. हे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या सर्व सहमतीने झाल्याचे स्पष्ट जाणवत होते.

आ. गाडगीळ, आ. खाडे यांचा पाठपुरावा

समांतर पुलाच्या लोकार्पणानंतर पालकमंत्री पाटील म्हणाले, 2016 मध्ये सावित्री नदीवरील पूल कोसळून 40 प्रवाशांना जलसमाधी मिळाली होती. त्यानंतर राज्यातील सर्वच पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश दिले होते. धोकादायक पुलांचा अभ्यास करून दुरुस्तीचे आदेश दिले होते. त्यावेळी सांगलीत आयर्विन पुलाला पर्यायी समांतर पुलाच्या बांधकामासाठी आमदार सुधीर गाडगीळ तसेच आमदार सुरेश खाडे यांनी बराच पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे या पुलाचे बांधकाम झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT