Paper vendor’s son success story Pudhari
सांगली

Paper vendor’s son success story: पेपर विक्रेत्याच्या मुलाने गाठले वर्दीचे ध्येय

प्रतीक धोत्रेची केंद्रीय सुरक्षा दलात भरारी

पुढारी वृत्तसेवा

पलूस : बांबवडे (ता. पलूस) येथील वर्तमानपत्र विक्रेते सुरेश धोत्रे यांचे चिरंजीव प्रतीक सुरेश धोत्रे यांची केंद्रीय गृह मंत्रालयांतर्गत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये निवड झाली आहे. जिद्द, कष्ट आणि सातत्याच्या जोरावर प्रतीकने केंद्रीय सुरक्षा दलातील वर्दीचे स्वप्न साकार करून परिसरातील तरुणांसमोर प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.

प्रतीकने 2023 मध्ये बीसीए पदवी पूर्ण केली. त्याआधीपासूनच त्याला वर्दीची ओढ होती. ग्रॅज्युएशननंतर केंद्रीय सुरक्षा दलातच भरती व्हायचा निश्चय करून त्याने अभ्यास, शारीरिक तयारी आणि मानसिक दृढतेचे काटेकोर नियोजन केले. या ध्येयासाठी प्रतीकने सलग पाच वर्षे विविध स्पर्धा परीक्षांना सामोरे जात सातत्याने प्रयत्न केले. अखेर सहाव्या वर्षी त्याला अपेक्षित यश मिळाले. 2025 मध्ये कोल्हापूर येथे लेखी परीक्षा दिल्यानंतर प्रतीकची शारीरिक व वैद्यकीय चाचण्यांसाठी निवड झाली. त्यानंतर पुणे येथे सर्व चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण करत 125 गुणांसह ओपन प्रवर्गातून तो अंतिम निवड यादीत दाखल झाला. या यशाचा आनंद साजरा करत जीवलग मित्रांनी गावातून त्याची मिरवणूक काढली.

“कमवा आणि शिका” हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रतीक पहाटे सराव, दिवसभर अभ्यास याबरोबरच सायंकाळी केक तयार करून त्यांची विक्री करण्याचा व्यवसाय करत असे. आई-वडिलांकडे कधीही हट्ट न धरता प्रतीकने सीआयएसएफमध्येच निवड व्हावी यासाठी अथक्‌‍ परिश्रम घेतले. त्याचे स्वप्न पूर्ण झाल्याने आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. प्रतीकचे वडील सुरेश धोत्रे गेली सुमारे 24 वर्षे गावात वर्तमानपत्र घरपोहोच वितरण सेवा अखंडपणे चालवत आहेत.

मुलाच्या आनंदात ते सध्या पेपर विक्रीसोबत मिठाई वाटण्यातही मग्न झाले आहेत. प्रतीकची आई कल्पना धोत्रे या ऑटो पापड मशीनवर पापड, शेवया, कुरवड्या, सांडगे अशी उन्हाळी वाळवणांची निर्मिती करतात. या व्यवसायातही प्रतीकने आईला नेहमीच मोलाची मदत केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT