बुधगाव : विठ्ठल मनी विठ्ठल तनी घेऊन पंढरीची वाट चालतानाच ते विठोबाचरणी जणू लीन झाले. बुधगाव येथून निघालेले वारीतील चोपदारांचा वारी मार्गावरच अकस्मात मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे बुधगावात शोककळा पसरली आहे.
प्रतिवर्षाप्रमाणे गावातील विठ्ठल मंदिरातून कार्तिकी वारीसाठी ह.भ.प. पुंडलिक महाराज दिंडी पंढरपूरच्या दिशेने रविवारी मार्गस्थ झाली होती. वर्षानुवर्षे या दिंडीचे चोपदार असणारे सुरेश गणपती पाटील (72) दिंडीत सहभागी झाले होते. त्यांची तब्येत ठीक नव्हती. तरीही 45 वर्षांपासून वारी चुकलेली नाही, आताही चुकवायची नाही, असे ठरवून त्यांनी प्रवास सुरू केला. पंढरपूरजवळ खर्डी गावात गुरुवारी रात्री मुक्कामाला दिंडी पोहोचली.
पहाटे काकडआरतीसाठी आवराआवर सुरू असतानाच पाटील यांना अस्वस्थ वाटू लागले. जवळपास मोठे रुग्णालय नसल्याने सोबत असणार्या सहकार्यांनी त्यांना उपचारासाठी परत सांगलीत आणायचा निर्णय घेतला. पण उपचार सुरू होण्याआधीच वाटेतच त्यांचे निधन झाले.