बोरगाव : प्रस्तावीत नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाविरोधातील आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय शेतकरी संघर्ष समितीने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शनिवार, १८ जुलै रोजी पंढरपूर येथे भव्य 'सद्बुद्धी यात्रा' काढण्यात येणार आहे. राज्यातील १३ जिल्ह्यांतील हजारो महामार्गबाधित शेतकरी या यात्रेत सहभागी होणार असून, वाळवा तालुक्यातील शेतकरीही मोठ्या संख्येने पंढरपुरात दाखल होणार आहेत. वाखरी ते श्री विठ्ठल मंदिर असा पायी मोर्चा काढून शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी जुनेखेड (ता. वाळवा) येथे शेतकऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीस कॉ. धनाजी गुरव, बी. जी. पाटील, रणजित पाटील, प्रा. शामराव पाटील, प्रा. अनिल पाटील, शहाजी पाटील तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भागवत जाधव यांच्यासह अनेक शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.
विठ्ठलाला घालणार साकडे
बैठकीत कॉ. धनाजी गुरव म्हणाले, आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूर येथे येणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर १३ जिल्ह्यांतील बाधित शेतकरी विठ्ठलाच्या चरणी एकत्र येतील आणि शक्तिपीठ महामार्ग हा विनाशकारी प्रकल्प तातडीने रद्द करण्यासाठी साकडे घालतील. शेतकर्यांची सुपीक जमीन वाचविण्याचा हा लढा असून मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील, अशी सबुद्धी पांडुरंगाने त्यांना द्यावी, अशी सामूहिक प्रार्थना केली जाणार आहे.
प्रस्तावीत शक्तिपीठ महामार्गामुळे नागपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील हजारो हेक्टर सुपीक शेतजमीन संपादित होणार आहे. यामुळे लाखो शेतकरी भूमिहीन होण्याचा धोका निर्माण झाला असल्याने या प्रकल्पाला तीव्र विरोध करत आंदोलन आणखी व्यापक करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.
बैठकीत सांगलीचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्या कार्यपद्धतीवरही टीका करण्यात आली. पोलिसांनी सत्ताधार्यांच्या दबावाखाली न राहता संविधान व लोकशाहीच्या चौकटीत सामान्य जनतेचे सेवक म्हणून निष्पक्षपणे काम करावे, अशी मागणी उपस्थितांनी केली. बैठकीस नितीन पाटील, बाळासाहेब गुरव, सहदेव पाटील, राहुल पाटील, धनाजी पाटील, रामचंद्र पवार, रणजित चव्हाण, विजय पाटील, संभाजी पाटील यांच्यासह वाळवा तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.