Kidnapping Case Pudhari Photo
सांगली

Panchayat Samiti member kidnapping case: शिवसेनेचे मोहन वनखंडे, अजित शेजूळ यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल

पुरावे गोळा करण्याचे काम पोलिसांकडून सुरू

पुढारी वृत्तसेवा

सांगली : मिरज पंचायत समितीच्या सभापती निवडीपूर्वी बुधगावचे सदस्य पांडुरंग इंगळे यांचे अपहरण केल्याप्रकरणी शिंदे शिवसेनेचे महापालिका क्षेत्रप्रमुख प्रा. मोहन वनखंडे, अजित शेजूळ यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करून, पुरावे गोळा करण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. त्यामुळे त्यांच्या अटकेची शक्यता आहे.

दरम्यान, याप्रकरणी यापूर्वी अटक केलेले संशयित समीर अकबर होनवाडे (वय 27, रा. नरवाड, ता. मिरज), अजित मुर्ग्याप्पा कट्टीकर (27), आनंद ऊर्फ गोटू बाबू गावडे (27), प्रशांत बाबासाहेब क्षीरसागर (20, तिघे रा. मालगाव, ता. मिरज) यांच्याकडे पोलिस कसून तपास करीत आहेत. मिरज पंचायत समिती सभापती निवडीपूर्वी बुधगावचे सदस्य पांडुरंग इंगळे यांचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार त्यांचा मुलगा अमर इंगळे यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली होती. मंगळवारी सभापती निवडीवेळी इंगळे गैरहजर राहिल्यामुळे नाट्यमय घडामोडी घडल्या. सभापती निवडी झाल्यानंतर रात्री मिरजेत आणून, नंतर सांगलीत सोडल्याचे अपहृत सदस्य पांडुरंग इंगळे यांनी सांगितले. त्यानंतर सांगली ग्रामीण पोलिसांनी त्यांना पोलिस ठाण्यात आणून जबाब नोंदवला. इंगळे यांचे अपहरण करून त्यांना गोव्यात नेण्यात आले होते.

या प्रकरणात संशयित समीर व्हनवाडे, अजय कट्टीकर, गोटू गावडे, प्रशांत क्षीरसागर (सर्व रा. मालगाव) यांचा सहभाग असल्याचेही इंगळे यांनी जबाबात म्हटले होते. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे सोपवला होता. सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी तपास करून संशयित समीर होनवाडे, अजित कट्टीकर, आनंद ऊर्फ गोटू गावडे, प्रशांत क्षीरसागर यांना अटक केली. अटकेतील चौघांची चौकशी केल्यानंतर त्यांनी शिंदे शिवसेनेचे प्रा. मोहन वनखंडे व पंचायत समितीच्या उपसभापतींचा मुलगा अजित शेजूळ यांच्या सांगण्यावरून इंगळे यांचे अपहरण केल्याचे सांगितले. चौघांचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. त्यानुसार पोलिसांनी या दोघांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी पुरावे गोळा करण्याचे काम सुरू केले असून या दोघांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. मात्र वनखंडे यांचा मोबाईल शनिवारी बंद होता. ते फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. ते पोलिसात हजर होतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT