Pudhari Photo
सांगली

Sangli Crime: पलूसमध्ये तणनाशकाच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी

पोलिस ठाण्यात परस्परविरोधी दोन गुन्हे दाखल

पुढारी वृत्तसेवा

पलूस : येथील वांगकर मळा परिसरात शेतजमिनीवरील तणनाशकाच्या वादातून शनिवारी सकाळी दोन कुटुंबांमध्ये हाणामारी झाली. याप्रकरणी दोन्ही बाजूंनी पलूस पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. हाणामारीत दोन्ही कुटुंबातील काहीजण जखमी झाले असून त्यांच्यावर पलूस येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पहिली फिर्याद रंजना प्रकाश पवार (वय 50, रा. वांगकर मळा, पलूस) यांनी दिली आहे. त्या व त्यांचे पती प्रकाश पवार हे सकाळी नऊच्या सुमारास गट क्रमांक 1700 मधील त्यांच्या शेतात काम करीत असताना संशयित दीपक पांडुरंग पवार व त्यांचा मुलगा प्रदीप पवार यांनी त्यांच्या शेतातील पिकावर तणनाशक फवारल्याचा संशय व्यक्त करून वाद घातला. वाद वाढल्याने प्रदीप पवार यांनी खोऱ्याने रंजना पवार यांच्या डोक्यात हल्ला केला, तर दीपक पवार यांनी प्रकाश पवार यांच्या हातावर काठीने हल्ला केला. त्यांचा मुलगा प्रशांत पवार मध्ये पडल्यावर त्यालाही लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या घटनेत रंजना पवार जखमी झाल्याने त्यांना पलूस येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मारहाण झाल्याची दोन्ही बाजूंकडून फिर्याद

दुसरी फिर्याद दीपक पांडुरंग पवार (वय 56, रा. वांगकर मळा, पलूस) यांनी दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, ते आणि त्यांचा मुलगा प्रदीप शेतातील द्राक्षबागेत छाटणीचे काम करत असताना प्रकाश शामराव पवार, त्यांचा मुलगा प्रशांत पवार आणि पत्नी रंजना पवार हे तणनाशकाच्या वादावरून शेतात आले. प्रकाश पवार यांनी हातातील खुरपे घेऊन दीपक पवार यांना मारण्याचा प्रयत्न केला. दीपक यांची पत्नी कमल पवार मध्ये पडल्याने त्यांच्या उजव्या हाताला जखम झाली. यावेळी प्रशांत पवार यांनी प्रदीप पवार याला काठीने मारहाण केली, तर रंजना पवार यांना चुकून खोऱ्याचा फटका लागला. या घटनेत दोन्ही बाजूंनी मारहाण व शिवीगाळ झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT