कुंडल : सततच्या पावसाने पलूस तालुका निसर्गसौंदर्याने नटला असून अतिशय मनमोहक, मनाला सुखद अनुभव देणारा निसर्गाच्या कुशीत वसलेला पलूस तालुका पर्यटकांना खुणावत आहे.
सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत पलूस तालुका वसलेला असून या पर्वतरांगांच्या कुशीतच वृक्षमित्र धों. म. मोहिते यांनी उभारलेले मानवनिर्मित यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्य प्रसिध्द आहे. तसेच तालुक्यात अनेक प्राचिन मंदिरे असून या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दीही होत असते. सागरेश्वर अभयारण्य परिसरात कड्यातील मारुती, जैन समाजाचे तीर्थक्षेत्र, वीरभद्र देवस्थान, सागरेश्वर मंदिर, लिंगेश्वर मंदिर, अभयारण्याच्या पूर्वेस कुंडल परिसरात मारुतीचे दर्शन घेण्यासाठी श्रावण महिन्यात भाविकांची गर्दी असते. सागरेश्वर अभयारण्य परिसरात लांडगा, कोल्हा, तरस, खोकड, काळवीट, रानमांजर, चितळ, काळवीट याचबरोबर गिधाड, घार, पिंगळा, धनछडी, सुगरण, खंड्या, सुतार, बगळा आदी पक्षीही आढळून येतात. अभयारण्य परिसरात देवतळे, बालोद्यान, छत्री बंगला, वेणूविहार तलाव, घोडेबीळ, तरस गुहा, महानगुंड आदी पर्यटनस्थळे आहेत.