अन्यायी करवाढीविरोधात पलूसकरांचा एल्गार  
सांगली

Sangli News : अन्यायी करवाढीविरोधात पलूसकरांचा एल्गार

कडकडीत बंद, जनजीवन विस्कळीत; सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुढारी वृत्तसेवा

पलूस : पलूस नगरपरिषदेने केलेल्या अन्यायी करवाढीच्याविरोधात सोमवारी शहरात पुकारण्यात आलेल्या कडकडीत बंद आणि सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

पलूस नगरपरिषदेने नुकतीच मोठ्या प्रमाणात करवाढ केली आहे. खासगी कंपनीकडून चुकीच्या पद्धतीने सर्वेक्षण करून चौपट ते दहापट कर आकारणी करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यामध्ये वृक्षसंवर्धन कर, स्वच्छता कर, शिक्षण कर अशा विविध करांच्या नावाखाली भरमसाट अन्यायी कर आकारणी करण्यात आली आहे. याविरोधात सर्वपक्षीयांच्यावतीने जनआक्रोश मोर्चा आणि पलूस बंदचे आवाहन करण्यात आले होते.

सकाळपासूनच शहरातील मुख्य व्यापारी पेठेतील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यामुळे शहरातील जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले होते. यावेळी आयोजित सभेत पलूस नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक दिगंबर पाटील म्हणाले, जे आज सत्तेवर आहेत त्यांनीच २०२३ मध्ये प्रशासक काळात या करवाढीविरोधात सुमारे दीड हजार हरकती गोळा केल्या होत्या. याचा त्यांना आता विसर पडला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नीलेश येसुगडे म्हणाले, सत्ताधारी मंडळी करवाढ करून जनतेचा पैसा ठेकेदारी जपण्यासाठी वापरत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीप कदम म्हणाले, ज्याप्रमाणे कोल्हापूर शहरात लोकांनी एकत्र येऊन लावलेला टोल प्रशासनाला मागे घ्यायला लावला आणि ताकद दाखवून दिली, त्याचप्रमाणे आपणही करू. भाजपचे नगरसेवक अमृत माळी, राष्ट्रवादीचे नगरसेवक धनाजी कुंभार, युवा सेना जिल्हाध्यक्ष विनायक गोंदील, शिवसेना पलूस तालुकाध्यक्ष प्रशांत लेंगरे, भाजपचे सागर सुतार, भाजपचे संजय गोंदील, माजी नगरसेवक दिलीप जाधव यांची भाषणे झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT