पलूस : पलूस पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस पक्षाने आठपैकी सात पंचायत समिती गणांवर दणदणीत विजय मिळवला. पलूस पंचायत समितीवर एकहाती सत्ता स्थापन केली आहे. दुधोंडी, रामानंदनगर, कुंडल, बांबवडे, आमणापूर, भिलवडी व वसगडे या सात पंचायत समिती गणांमध्ये काँग्रेसने विजय मिळवत भाजपवर धोबीपछाड केली आहे. केवळ अंकलखोप पंचायत समिती गणामध्ये भाजपला एकमेव जागा जिंकता आली आहे. त्यामुळे पलूस तालुक्यात काँग्रेसचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले.
गत निवडणुकीत पलूस पंचायत समितीवर भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. त्यावेळी काँग्रेसला सत्तेपासून दूर राहावे लागले होते आणि त्या पराभवाचा धक्का काँग्रेसने दीर्घकाळ सहन केला होता. मात्र या निवडणुकीत काँग्रेसने ठोस रणनीती, संघटनात्मक ताकद आणि प्रभावी प्रचाराच्या जोरावर मागील पराभवाचा बदला घेतला.
कुंडल पंचायत समिती गणामध्ये काँग्रेसच्या हेमा सुहास पवार यांनी 7777 मते मिळवत भाजपच्या शुभांगी संदीप पवार यांचा पराभव केला. बांबवडे पंचायत समिती गणामध्ये काँग्रेसच्या सुवर्णा पांडुरंग संकपाळ यांनी 7863 मते मिळवत भाजपच्या सुनंदा पोपट संकपाळ यांचा 1912 मतांनी पराभव केला. सुनंदा संकपाळ यांना 5951 मते मिळाली. सुवर्णा संकपाळ या स्वातंत्र्यसेनानी नारायण आप्पा संकपाळ यांच्या सुनबाई असून माजी उपसरपंच पांडुरंग संकपाळ यांच्या पत्नी आहेत. दुधोंडी पंचायत समिती गणामध्ये काँग्रेसचे जगन्नाथ भीमराव मोटे यांना 5292 मते मिळाली, तर भाजपच्या अश्विनी श्रीरंग पाटील यांना 5235 मते मिळाली. मोटे यांनी अवघ्या 57 मतांनी अत्यंत चुरशीच्या लढतीत विजय मिळवला.
पराभूत अश्विनी पाटील या माजी जिल्हा परिषद सदस्या असून महाराष्ट्र केसरी दिनकर दह्यारी यांच्या सुनबाई आहेत. त्यामुळे हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागणारा ठरला. जगन्नाथ मोटे यांच्या विजयासाठी पलूस-कडेगाव काँग्रेसचे युवक अध्यक्ष प्रमोद जाधव यांनी प्रभावी प्रचार यंत्रणा राबवली होती. मागील निवडणुकीत येथे भाजपचा उमेदवार निवडून आला होता. रामानंदनगर पंचायत समिती गणामध्ये काँग्रेसचे प्रशांत गोविंद नलवडे यांनी 6357 मते मिळवत भाजपचे दीपक भालचंद्र मोहिते यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. दीपक मोहिते यांना केवळ 3385 मते मिळाली. प्रशांत नलवडे यांनी 2972 मतांनी दणदणीत विजय मिळवला. प्रशांत नलवडे हे रामानंदनगर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच असून त्यांनी पंचायत समितीचे माजी सभापती दीपक मोहिते यांचा विक्रमी मतांनी पराभव केल्याने हा निकाल भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
आमणापूर पंचायत समिती गणामध्ये काँग्रेसचे वैभव उत्तमराव उगळे यांनी 6983 मते मिळवत भाजपचे उदय आनंदा साळुंखे यांचा पराभव केला. उदय साळुंखे यांना 4933 मते मिळाली. वैभव उगळे यांनी तब्बल 2050 मतांनी उच्चांकी विजय मिळवत काँग्रेसचा झेंडा फडकावला. अंकलखोप पंचायत समिती गणामध्ये काँग्रेसचे जितेश सुरेश बनसोडे यांना 5123 मते मिळाली, तर भाजपचे आनंदराव मल्हारी कुराडे यांना 6023 मते मिळाली. भाजपचे आनंदराव कुराडे यांनी 900 मतांनी विजय मिळवत भाजपसाठी एकमेव दिलासादायक जागा जिंकली.
भिलवडी पंचायत समिती गणामध्ये भाजपच्या सुनीता शिवाजी गायकवाड यांना 5408 मते मिळाली, तर काँग्रेसच्या हजराबी बालेचांद सलामत यांना 5619 मते मिळाली. हजराबी सलामत यांनी 211 मतांनी विजय मिळवला. वसगडे पंचायत समिती गणामध्ये भाजपच्या मंजुषा धोंडिराम पाटील यांना 4865 मते मिळाली, तर काँग्रेसच्या शोभाताई आनंदा हजारे यांना 5610 मते मिळाली. शोभाताई हजारे यांनी 745 मतांनी विजय मिळवत काँग्रेसचा विजय सुनिश्चित केला.