37 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेवर भ्रष्टाचाराचे आरोप 
सांगली

Sangli News : 37 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेवर भ्रष्टाचाराचे आरोप

जलवाहिनीस गळती, दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका : नगरसेवक अमृत माळी

पुढारी वृत्तसेवा

पलूस : पलूस शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या 37 कोटी रुपयांच्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचार आणि निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप भाजप नगरसेवक अमृत माळी यांनी केला आहे. दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून, या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. निवडणुकीच्या तोंडावर केवळ श्रेयवादासाठी घाईगडबडीत हे काम पूर्ण करण्यात आले असून, हा जनतेच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार असल्याचे माळी यांनी निवेदनात म्हटले आहे.

माळी म्हणाले, नदीपासून सुमारे सहा किलोमीटरपर्यंत टाकण्यात आलेल्या पाईपलाईनला दररोज गळती लागत असल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जर काम तांत्रिकदृष्ट्या सक्षम झाले असते, तर वारंवार गळती का लागते? असा सवाल उपस्थित करत त्यांनी ठेकेदाराने वापरलेल्या पाईपची गुणवत्ता तपासण्याची गरज आहे.

माळी म्हणाले, जॅकवेल आणि फिल्टर प्लांट परिसरात सध्या शाईच्या थरासारखे काळे आणि दूषित पाणी साचले आहे. हेच पाणी कोणतीही प्रभावी प्रक्रिया न करता थेट शहराला पुरवले जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. हे पाणी पिण्यायोग्य असल्याचे प्रमाणपत्र कोणत्या प्रयोगशाळेने दिले, याचा अहवाल जनतेसमोर जाहीर करावा. प्रसंगी तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा अमृत माळी यांनी दिला आहे.

पाणी योजनेचे ‌‘थर्ड पार्टी ऑडिट‌’ करा

दूषित पाण्यामुळे लहान मुले, वृद्ध नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला असून, भविष्यात एखादी जीवित हानी झाल्यास त्याची नैतिक व कायदेशीर जबाबदारी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि सत्ताधाऱ्यांनी स्वीकारावी, असेही माळी यांनी स्पष्ट केले. अशा निष्काळजीपणामुळे कोणाचा जीव गेला तर संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का करू नये? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. पाणी योजनेचे ‌‘थर्ड पार्टी ऑडिट‌’ करावे, जोपर्यंत पाणी पूर्णपणे शुद्ध होत नाही तोपर्यंत दूषित पाण्याचा पुरवठा थांबवून नागरिकांना पर्यायी शुद्ध पाणी उपलब्ध करून द्यावे, तसेच निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून त्याच्यावर कठोर दंडात्मक कारवाई करावी, अशा मागण्यांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT