शिराळा ः शिराळा तालुक्यात साडेपाच महिन्यांनंतर रविवारपासून पावसाने उघडीप दिली. त्यामुळे खोळंबलेल्या खरीप हंगामातील काढणी, मळणी व रब्बी पेरणीला पुन्हा गती आल्याने शिवार लोकांच्या गर्दीने फुलला आहे. 50 टक्के हंगाम पूर्ण झाला आहे. 15 दिवसात हंगामाची सांंगता होईल. भात पिकांचे क्षेत्र 12 हजार 500 हेक्टर आहे.
सध्या हाता-तोंडाला आलेली खरीप पिके पदरात पाडून घेण्यासाठी शेतकर्यांची धडपड सुरू आहे. एकाचवेळी दोन्ही हंगाम सुरू झाल्याने जादा मजुरी देऊनही मजूर मिळत नसल्याने मजूर मिळविण्यासाठी शेतकर्यांना कसरत करावी लागत आहे.
तालुक्यात भाताच्या रत्नागिरी 1, 24, इंद्रायणी, जया, बासमती, तेलीहंसा, शिराळी, जोंधळे, कर्जत, कोमल, खरपे, पांढरे या हंगामातील बियाणांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. पहिल्या टप्यात पेरणी झालेली भात काढणी पुढे गेली असल्यामुळे पिके शेतातच झडायला लागली आहेत. त्यामुळे उत्पादनात घट होत आहे. काढलेली पिके व भाताचे भिजलेले पिंजर उन्हात घालण्यासाठी व नुकसान होऊन राहिलेली पिके काढावयासाठी लगबग सुरू आहे.