सांगली

Milk Production: जास्त दुधासाठी घातक 'ऑक्सिटोसिन'चा वापर

म्हैस, गाय पान्हवण्यासाठीचे इंजेक्शन : जीवघेण्या आजारांना आमंत्रण

पुढारी वृत्तसेवा
विवेक दाभोळे

सांगली : म्हैस, गाय पान्हवण्यासाठी बऱ्याचवेळा जीवघेण्या परिणामास आमंत्रण देणारे 'ऑक्सिटोसिन' इंजेक्शन गाई, म्हशींना देण्यात येते. हे इंजेक्शन देऊन धार काढलेले दूध जीवघेण्या आजारांना आमत्रण देणारे ठरते. त्या जनावरांनाही हे इंजेक्शन घातक ठरते.

गाई, म्हशींना इंजेक्शन देणे बेकायदेशीर असून, यामुळे जनावरांना पान्हा फुटतो आणि दूध जबरदस्तीने काढले जाते. हे दूध पिणे मानवी आरोग्यासाठी घातक ठरते, असे आरोग्यतज्ज्ञांचे म्हणणे आहे. ऑक्सिटोसिन इंजेक्शन हे एक संप्रेरक आहे. जनावरांना वासराशिवाय पटकन पान्हा फुटावा म्हणून हे इंजेक्शन दिले जाते. असे ऑक्सिटोसिनयुक्त दूध सतत प्यायल्याने मानवाचे हृदयाचे ठोके वाढू शकतात.पोटाचे विकार होतात. पचनक्रिया बिघडणे व पोटदुखी यांसारखे त्रास होतात. तसेच वारंवार या इंजेक्शनचा वापर केल्याने जनावरांच्या आरोग्यावर व आयुष्यावर विपरीत परिणाम होतो. भारत सरकार आणि अन्न व औषध प्रशासनाने (FDA) जनावरांसाठी या इंजेक्शनच्या वापरावर बंदी आहे. याचा वापर हा कायद्याने मोठा गुन्हा असून, याचा साठा किंवा विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाते.

ऑक्सीटॉसिन हे एक सजीवांच्या शरीरात स्रवणारे संप्रेरक आहे, जे सामान्यत: हायपोथालेमसमध्ये तयार होते आणि पोस्टरियर पिट्यूटरीद्वारे सोडला जातो. हे मानवांमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते ज्यात सामाजिक बंधन, प्रेम, पुनरुत्पादन, बाळंतपण आणि बाळंतपणानंतरचा कालावधी यांचा समावेश होतो. तसेच बऱ्याचवेळा ऑक्सिटोसिन हे लैंगिक क्रिया आणि बाळंतपणाच्या प्रतिसादात संप्रेरक म्हणून रक्तप्रवाहात सोडले जाते. हे मादीच्या शरीरात दूध निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणारे संप्रेरक आहे.

ऑक्सिटोसिन हे एक नैसर्गिक संप्रेरक (हार्मोन) आहे, जे सस्तन प्राण्यांच्या शरीरात दूध निर्मितीसाठी आणि पान्हा फुटण्यासाठी मदत करते. मात्र, दुग्धव्यवसायात जास्त दूध मिळवण्यासाठी गाई-म्हशींना याच्या कृत्रिम इंजेक्शनचा बेकायदेशीर वापर करतात. ऑक्सिटोसिन हे जनावरांच्या शरीरातून झरणारे संप्रेरक आहे, ज्यामुळे वासराला पाजण्यासाठी किंवा धार काढताना जनावराला पान्हा फुटतो. अनेक मोठे गोठेवाले किंवा शेतकरी जनावरांकडून जबरदस्तीने व जास्त दूध काढण्यासाठी या इंजेक्शनचा वापर करतात. अशा घटना सातत्याने उघडकीस येतात.

बंदी घालण्याचा विचार :

ऑक्सीटोसिन हा मानवांमध्ये आणि प्राण्यांमध्ये उत्सर्जित होणारा महत्त्वाचा हार्मोन आहे. याचं मुख्य जे कार्य आहे ते म्हणजे गर्भवती जेव्हा प्रसूती होते, तेव्हा त्या गर्भाशयाचे आकुंचन होऊन गर्भ बाहेर पडणे किंवा बाळाचा जन्म देणे. परंतु हे कार्य प्राण्यांमध्येही होत असते. ऑक्सीटोसिन हार्मोन हा प्राण्यांच्या शरीरात टाकून त्यांच्या शरीरामधून दूध वाढवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. हा अंश त्यांच्या दुधामध्ये उतरतो. परंतु हे दूध अत्यंत धोकादायक ठरते. खरे तर यातूनच आता ऑक्सीटोसिनवर आंतरराष्ट्रीय पातळीवर बंदी घालण्याचा विचार सुरू आहे. काही राष्ट्रात यावर बंदीदेखील आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे नूतन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या संप्रेरकाचे इंजेक्शन देण्याविरोधात कडक मोहीम राबविली तरच या इंजेक्शनच्या वापरास आळा बसू शकेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT