Sangli: जिल्ह्यातील दोन लाखावर शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ  Pudhari
सांगली

Sangli: जिल्ह्यातील दोन लाखावर शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ

63 हजार शेतकऱ्यांकडे 1063 कोटी थकीत; 1.75 लाख नियमित कर्जदार

पुढारी वृत्तसेवा

सांगली : सरकारने अखेर बहुप्रतीक्षित असलेली शेतकरी कर्जमाफी जाहीर केली. सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे. जिल्हा बॅँकेचे या तारखेपर्यंतचे थकबाकीदार शेतकरी तब्बल 62 हजार 571 असून त्यांच्याकडे मुद्दल 729 कोटी रुपये आहे. व्याजासह ही एकूण थकबाकी एक हजार 63 कोटी रुपये आहे, तर नियमित कर्ज परतफेड करणारे 1 लाख 75 हजार शेतकरी आहेत. किती थकबाकीदारांना प्रत्यक्षात कर्जमाफीचा लाभ मिळणार? याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष असून शासन यासाठी कोणते निकष लावणार याची प्रतीक्षा आहे.

महायुतीने विधानसभा निवडणुकीत सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिलेे. मात्र प्रत्यक्षात सत्तेवर आल्यावर हे आश्वासन पाळण्यात सरकारकडून विलंब होत असल्याने मागीलवर्षी शेतकऱ्यांनी नागपूर येथे मोठे आंदोलन केले. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना जून 2026 पर्यंत कर्जमाफी देणार असल्याचे जाहीर केले. तसेच कर्जमाफी कशा पध्दतीने द्यायची, यासाठी समिती नियुक्त करण्यात आली असून तिचा अहवाल एप्रिल 2026 मध्ये येणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार हे निश्चित होते, मात्र ती किती व कधी? याची उत्सुकता होती. तीही आता संपली असून राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सप्टेंबर 2025 अखेर पीक कर्जाच्या थकबाकीदार शेतकऱ्यांची दोन लाखापर्यंतची कर्जमाफी करणार असल्याचे जाहीर केले.

तसेच नियमित कर्जदार यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी शासनाने गेल्या तीन महिन्यांपासून माहिती संकलन सुरू केले होते. जिल्हा बॅँक व अन्य बँकांकडून जून 2025 पर्यंतचे थकबाकीदार व नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती मागवण्यात आली होती. ही माहिती शासनाने तयार केलेल्या पोर्टलवर भरण्यात येत आहे. जिल्हा बँकेचे 62 हजार 571 शेतकरी थकीत आहेत. त्यांच्याकडे व्याजासह 1063 कोटींची थकबाकी आहे. यातील किती शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ मिळणार, हे आता शासनाकडून कर्जमाफीचे निकष जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT