Over a petty dispute involving just 10 rupees, a blood relative slashed the victim's neck with a sickle.
विटा : विजय लाळे
माणुसकी नेमकी कुठे चालली आहे, असा प्रश्न पडावा अशी एक सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. अवघे १० रुपये जादा घेतले म्हणून मनात धरलेल्या रागाचा शेवट एका ७६ वर्षीय वृद्धाच्या निर्घृण हत्येने झाला आहे. ज्या रक्ताच्या नात्यावर विश्वास ठेवून वृद्ध बाबासाहेब देशमुख त्या दिवशी दुचाकीवरून निघाले होते, त्याच नात्याने त्यांचा विश्वासघात करून त्यांचा जीव घेतला. याप्रकरणी 35 वर्षीय संजय देशमुख यास सांगोला पोलिसांनी अटक केली आहे.
बाणूरगड येथील बाबासाहेब भानुदास देशमुख हे आपल्या छोट्याशा किराणा दुकानातून लोकांची सेवा करायचे. १५ दिवसांपूर्वी त्यांचा नातेवाईक संजय देशमुख याने दुचाकीसाठी पेट्रोल घेतले होते. पेट्रोलची किंमत १२० रुपये असताना बाबासाहेबांनी १३० रुपयांची मागणी केली. हे अवघे १० रुपये संजयला इतके बोचले की, त्याने वयोवृद्ध बाबासाहेबांच्या हत्येचा कट रचला.
शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास बाबासाहेब कोळे येथील आठवडी बाजारासाठी निघाले होते. वाटेत दुचाकी दुरुस्तीच्या निमित्ताने ते थांबले असता, संजयने त्यांना विश्वासात घेतले. "चला, आपण मटण खायला जाऊ," असं म्हणत त्याने बाबासाहेबांना आपल्या सोबत नेले. ज्याला आपण आपला मानतो, त्याच्यासोबत बाबासाहेब आनंदाने गेले. पण तो आनंद काही क्षणांचाच ठरला.
बाणूरगड ते कोळे दरम्यानच्या निर्जन कालव्यापाशी पोहोचताच संजयने आपला खरा चेहरा दाखवला. १० रुपयांच्या रागातून त्याने सोबत आणलेल्या कोयत्याने ७६ वर्षीय बाबासाहेबांच्या डोक्यावर आणि मानेवर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बाबासाहेबांचा जागीच मृत्यू झाला.
शनिवारी सकाळी घटना उघडकीस येताच परिसरात खळबळबळ उडाली. सांगोला पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. श्वान पथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने पोलिसांनी अवघ्या पाच तासांत संशयित संजय देशमुखला ताब्यात घेतले आणि पोलिसी खाक्या दाखवताच त्याने अवघ्या १० रुपयांसाठी केलेल्या या क्रूर कृत्याची कबुली दिली.