सर्व सेवा सोसायट्या मार्चअखेर ऑनलाईन होणार 
सांगली

राज्यातील 6 हजारांवर सोसायट्या एका क्लिकवर

संगणकीकरणाचे काम वेगाने सुरू ः सर्व सेवा सोसायट्या मार्चअखेर ऑनलाईन

पुढारी वृत्तसेवा
शशिकांत शिंदे

सांगली : राज्यातील विकास सेवा संस्था संगणकीकृत करण्याचा निर्णय वर्षापूर्वी झाला. त्यात बारा हजार संस्थांपैकी सुमारे 6 हजार संस्थांचे संगणकीकरण पूर्ण होऊन ऑनलाईन काम सुरू झाले आहे. गावातील शेतकरी, संस्था यांची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होऊ लागली आहे. त्यामुळे आता पारदर्शी कारभार होऊन विकासाला चालना मिळणार आहे. दरम्यान, बाकी संस्थांचेही ऑनलाईनचे काम मार्चअखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यातील अनेक गावांमधील सेवा संस्थांत आता संगणक बसविले आहेत. गावातील सेवा सोसायटींमध्ये बुकवर चालणारे काम आता ऑनलाईन पद्धतीने सुरू झाले आहे. तसेच अन्य कामे व व्यवहार ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत. या संस्था गावातच शेतकर्‍यांना विविध सेवा पुरविण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.पूर्वी केवळ रासायनिक खते पुरवणारी गावपातळीवरील विकास सेवा संस्था आता महत्त्वाची भूमिका बजावत आहे. वीज बिल भरणा करणे, ऑनलाईन बँकेचे व्यवहार करणे, गावातील सभासदांसाठी उपयुक्त गरजेच्या सेवा पुरवत आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेशी संलग्न असणार्‍या सेवा संस्था शेतकर्‍यांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. या संस्था गावातील शेतकर्‍यांच्या आर्थिक गरजा गावातच पूर्ण करतात. शेतकर्‍यांच्या प्रगतीसाठी सेवा संस्थांचा हातभार महत्त्वाचा मानला जातो. सहकारी सेवा संस्थांचे दप्तरही संगणकीकृत झाले असून, त्या अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. प्रत्येक गावातील सेवा संस्था आता आधुनिक होत आहेत.

मनमानी कारभाराला बसणार चाप

गावपातळीवर संस्थांच्या माध्यमातून राजकारण केले जाते. विरोधी गटातील शेतकर्‍यांना कर्ज देण्यापासून विविध कारणाने त्रास देण्यात येत होता. आता ऑनलाईनमुळे या मनमानीला चाप बसणार असून, पारदर्शी कारभार होणार आहे.

प्रमुख जिल्ह्यांतील संस्था व संगणकीकरण...

जिल्हा एकूण संस्था संगणकीकरण

अहमदनगर 946 756

कोल्हापूर 1751 638

सांगली 650 519

सातारा 933 720

पुणे 1192 532

जुने-नवे होणार बंद

सेवा सोसायटीचा कारभार यापूर्वी कागदोपत्री होत होता. अनेक वेळा संस्थेचे प्रमुख कर्जाची फिरवा-फिरवी करून कर्ज वाटप- वसुली दाखवत होते. परंतु आता सर्व व्यवहार ऑनलाईन झाल्याने जुने-नवे हा प्रकार बंद होणार आहे.

धोेरण ठरवणे होणार सुलभ

ऑनलाईनमुळे संस्था, शेतकर्‍यांची माहिती तत्काळ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पीक, कर्ज, क्षेत्र आदी माहिती समजणार आहे. सरकारला धोरण ठरवताना याचा उपयोग होणार आहे.

सेवा सोसायट्या ऑनलाईन झाल्याने कामकाज करताना गती येणार आहे. शासनाचे विविध लाभ शेतकर्‍यांच्या खात्यावर थेट जमा होणार आहेत. त्यामुळे धोरण ठरविणे आता सोपे होणार आहे.
शिवाजीराव वाघ, सीईओ, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक.
सेवा संस्थांच्या संगणकीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रात संस्था व शेतकरी यांचे प्रमाण जास्त आहे. कर्जांचे विविध प्रकार आहेत. त्यामुळे वेळ लागत आहे. लवकरच सर्व संस्था ऑनलाईन होतील.
मंगेश सुरवसे, जिल्हा उपनिबंधक, सांगली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT