सांगली : मृत्यूनंतर एखाद्याच्या शरीरातील अवयव इतरांच्या जगण्याचे कारण ठरू शकतात. मात्र दुर्दैवाने समाजात आजही अवयवदानाबाबत माहिती आणि जागरुकता फारच कमी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अवयवगरजू रुग्णांची प्रतीक्षा यादी वर्षागणिक वाढत चालली आहे. राज्यात हृदय, मूत्रपिंड, यकृत, फुप्फुस, स्वादुपिंड, लहान आतडे यांसारख्या अवयवांच्या प्रतीक्षेत 9,418 रुग्ण आहेत. खरे तर अवयव निकामी झाल्याने मृत्युमुखी पडणार्यांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे अवयवदान याविषयी व्यापक जागरुकता आणि प्रत्यारोपण सहज, सुलभ व आर्थिक आवाक्यात येणे करणे गरजेचे आहे.
महाराष्ट्रात गेल्यावर्षी अवयव गरजूंच्या प्रतीक्षा यादीत 8 हजार 240 रुग्ण होते. यावर्षी ही संख्या 9 हजार 418 झाली आहे. दात्यांअभावी रुग्णांची प्रतीक्षा यादी वाढत चालली आहे. प्रतीक्षा यादीत न आलेले, पण अवयव निकामी होऊन दरवर्षी मृत्युमुखी पडणार्या रुग्णांची संख्या खूप मोठी आहे. महाराष्ट्रात सध्या मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेत 7,269 रुग्ण आहेत. 1 हजार 919 रुग्णांना यकृत पाहिजे, 141 रुग्णांना हृदय हवे आहे. 51 रुग्णांना फुप्फुसांची गरज आहे. 32 रुग्ण स्वादुपिंडाच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच लहान आतडे मिळते का, याकडे लक्ष लावून बसलेले 6 रुग्ण प्रतीक्षा यादीत आहेत. खरे तर या प्रतीक्षा यादीबाहेरही हजारो रुग्ण असतात, जे अवयव निकामी झाल्याने मृत्युमुखी पडतात. त्यातून अवयव दानाची गरज अधोरेखित होते.
एखाद्या मेंदूमृत (ब्रेनडेड) व्यक्तीचे अवयव गरजू आठ व्यक्तींचे प्राण वाचवू शकतात. मात्र समाजात पुरेशी जाणीव जागृती नसल्याने अवयव दानाचे प्रमाण अत्यल्प आहे. जगण्याची दुर्दम्य इच्छा आहे; पण प्रत्यारोपणासाठी आवश्यक अवयवच मिळत नसल्याने अनेक रुग्ण मृत्यूला कवटाळतात. अवयवाच्या प्रतीक्षेतील अनेक रुग्ण मृत्यूच्या दिशेने पुढे सरकत असतात. त्यामुळे अवयवदानाची चळवळ मोठ्या गतीने पुढे सरकणे आवश्यक आहे.
जिवंत व्यक्तीकडून अवयवदान!
तंदुरुस्त असलेली 18 वर्षांवरील कोणतीही व्यक्ती आपल्या मर्जीने अवयवदान करू शकते. जिवंत व्यक्तीकडून दोनपैकी एक किडनी, यकृताचा थोडा भाग (एकतृतीयांश) दान करता येऊ शकतो. यकृताचा काही भाग कापून घेतल्यानंतर काही कालावधीत तो पुन्हा वाढून पूर्ण आकार प्राप्त करू शकतो. अवयव देणार्याच्या शरीरातील आणि अवयव ज्या रुग्णात प्रत्यारोपण केले आहे, त्याच्यात यकृत वाढत जाते. अवयवदान करणार्यांमध्ये जवळचे नातेवाईक (पती, पत्नी, मुलगी, मुलगा, आई, वडील, भाऊ, बहीण, आजी, आजोबा, नातू, नात) आणि लांबचे नातेवाईक (मामा, काका, त्यांची मुले) असे दोन प्रकार आहेत. एखाद्या व्यक्तीची किडनी निकामी झाली असेल आणि त्या कुटुंबातील नातेवाईकांची किडनी मॅच होत नसेल, तसेच दुसर्या एका वेगळ्या कुटुंबातही अशीच स्थिती असेल, तर त्या दोन कुटुंबांमध्ये किडनी दान होऊ शकते. त्याला कायद्याने मान्यता दिलेली आहे.
मृत्यूनंतर अवयवदान!
नैसर्गिक मृत्यू आणि मेंदूमृत्यू (ब्रेनडेड) हे दोन प्रकार आहेत. नैसर्गिक मृत्यूनंतर नेत्रदान, त्वचादान, देहदान करता येते. नेत्रदानामध्ये डोळ्याचा पुढचा पारदर्शक काचेसारखा भाग म्हणजे कॉर्निया काढून घेतला जातो. ज्या अंध व्यक्तीचा कॉर्निया अपारदर्शक झाला आहे, त्याला तो बसवला जातो. वैद्यकीय महाविद्यालयांसाठी देहदान करता येते. अपघात, आघात, डोक्याला इजा किंवा मेंदूत रक्तस्राव या कारणांमुळे मेंदू मृत होतो. श्वसन बंद होते. पण कृत्रिम श्वासोच्छ्वासाद्वारे श्वसन चालू ठेवलेले असते. अशावेळी ब्रेनडेड (मेंदूमृत्यू) ठरवण्याचा अधिकार मान्यताप्राप्त हॉस्पिटलना असतो. ब्रेनडेड व्यक्तीचे हृदय, दोन फुप्फुसे, यकृत, दोन किडन्या, स्वादुपिंड, आतडी, हाडे, लिगामेंट, डोळे, त्वचा यांसह जे जे अवयव चांगले आहेत, ते ते सर्व अवयव गरजू रुग्णाला दान करता येऊ शकतात.
मृतदेह दहन किंवा दफन केला जातो. दहन / दफनापूर्वी त्याच्या शरीरावरील मौल्यवान दागिने काढून घेतले जातात. परंतु त्याहूनही अनमोल दागिने म्हणजे डोळे, त्वचा हे जाळून टाकतो अथवा जमिनीत गाडून मातीमोल करतो. देशात आज लाखो अंध व्यक्ती कॉर्नियाच्या प्रतीक्षेत आहेत. हजारो व्यक्ती हृदय, फुप्फुस, यकृत, मूत्रपिंड, स्वादुपिंड आदी अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत. अशा रुग्णांना मेंदू मृत (ब्रेन डेड) व्यक्तीचे अवयव उपलब्ध झाल्यास त्यांना नवे जीवन मिळू शकते.- डॉ. हेमा चौधरी, जिल्हा समन्वयक, दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन