तासगाव : अलीकडच्या काळात गुन्ह्यांचे स्वरूप, व्याप्ती आणि जटिलता यामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. तंत्रज्ञानामधील प्रगतीमुळे सायबर क्राईम, आर्टिफिशीयल इंटेलिजन्स्, सोशल मीडिया, डीप-फेक, डार्क वेब यांचा उपयोग करून आरोपी गुन्हे करीत आहेत. पोलिसांनी प्रशिक्षण केंद्रामध्ये त्यांना मिळालेले ज्ञान वृद्धिंगत करून प्रामाणिकपणे कर्तव्य बजावले, तरच जनता तुम्हाला मान देऊन सन्मान करेल, असे प्रतिपादन प्रवीणकुमार पडवळ, विशेष पोलिस महानिरीक्षक, प्रशिक्षण व खास पथके यांनी तुरची (ता. तासगाव) येथे केले.
पोलिस प्रशिक्षण केंद्र, तुरची ता. तासगाव, जि. सांगली येथे सत्र क्रमांक 10 मधील 476 प्रशिक्षणार्थी महिला पोलिस अंमलदार यांचा दीक्षांत संचलन सोहळा सोमवार (दि. 9) रोजी पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या कवायत मैदानावर पार पडला. या दीक्षांत संचलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रवीणकुमार पडवळ बोलत होते. यावेळी पडवळ यांनी दीक्षांत संचलन उत्कृष्टरित्या पार पाडल्याबद्दल प्राचार्य धीरज पाटील व सर्व पोलिस अधिकारी/प्रशिक्षक तसेच सर्व महिला प्रशिक्षणार्थीचे अभिनंदन केले. नियोजन समितीच्या माध्यमातून प्रशिक्षण केंद्रामध्ये विविध सुविधा निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध केल्याबद्दल जिल्हाधिकार्यांचे आभार मानले. प्रशिक्षणार्थींना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व प्रशिक्षणार्थींनी दिमाखदार संचलन केले. परेड कमांडर नवप्रविष्ट प्रशिक्षणार्थी महिला पोलिस अंमलदार अंजली यादव यांनी प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली.
प्राचार्य धीरज पाटील म्हणाले, प्रशिक्षण सत्रातील नऊ महिन्यांच्या कालावधीत फौजदारी कायदे, कायदा आणि सुव्यवस्था, विज्ञान व तंत्रज्ञान, पोलिस प्रशासन या विषयांचे सखोल ज्ञान देण्यात आले. तसेच बाह्य वर्गातील शारीरिक कवायत प्रशिक्षण, परेड, पोलिस खात्यातील वेगवेगळ्या हत्यारांचे प्रशिक्षण, गोळीबार सराव, कमांडो प्रशिक्षण व योगाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशिक्षणात, 474 प्रशिक्षणार्थी महिला पोलिस उत्तीर्ण झाल्या आहेत. यामध्ये सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थीचा चषक चंद्रकला जाधव या प्रशिक्षणार्थीने पटकावला. सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी उपविजेता, आंतरवर्ग सर्व विषयांत प्रथम, तसेच विषय क्रमांक 1 ते 3 मध्ये सर्वाधिक गुण प्राप्त झालेली प्रशिक्षणार्थी, असे तिन्ही चषक किशोरी शेलार या प्रशिक्षणार्थीने पटकावले.
बाह्य वर्गाच्या सर्व विषयांत प्रथम राणी वाढई, सर्वोत्कृष्ट गोळीबार मिना मेंगाळ, पी.टी. मधील सर्वोत्कृष्ठ प्रशिक्षणार्थी शिवाणी चौगले, सर्वोत्कृष्ठ खेळाडु सोनाली पवार, कमांडो कोर्स सर्वोत्कृष्ठ प्रशिक्षणार्थी कोमल सावते, सर्वोत्कृष्ट शिस्तप्रिय प्रशिक्षणार्थी अंजली यादव, विषय क्रमांक 4 ते 8 मध्ये सर्वाधिक गुणप्राप्त प्रशिक्षणार्थी भारती राऊत यांनी चषक पटकावले. प्राचार्य धीरज पाटील यांनी महिला प्रशिक्षणार्थींना कर्तव्याची शपथ दिली. उपप्राचार्य राजश्री पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलिस अधीक्षक संदीप घुगे, उपविभागीय अधिकारी सचिन थोरबोले, तुरचीचे सरपंच विकास डावरे, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, तहसीलदार अतुल पाटोळे, मुख्याधिकारी सुधाकर लेंडवे, सुनील शेटे आदी उपस्थित होते.
या पोलिस प्रशिक्षण केंद्रातील 476 महिला पोलीस प्रशिक्षणार्थी ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई, मिरा-भाईंदर, पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, नाशिक शहर, छत्रपती संभाजी नगर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, धाराशिव, अमरावती शहर, नागपूर शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगांव, नंदुरबार, बीड, वाशिम, बुलडाणा, नांदेड, लातुर, परभणी, नागपूर ग्रामीण, गडचिरोली, गोंदिया, लोहमार्ग-पुणे अशा एकूण 27 पोलिस घटकांमधून आलेल्या आहेत.