ईश्वरपूर : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली पैसे घेऊन खोटा धनादेश दिल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीस एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व 4 लाखांचा दंड ठोठावला आहे. हा निकाल प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. ए. जाधव यांनी दिला.
या प्रकरणातील फिर्यादी सुनिल बाळासाहेब आंबी (रा. जुनेखेड, ता. वाळवा) यांनी डिसेंबर 2021 मध्ये विकास दगडू हटकर (रा. बाचणी, ता. कागल, जि. कोल्हापूर) यास शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी 3 लाख रुपये दिले होते. सहा महिन्यांत चांगल्या परताव्यासह रक्कम परत देण्याचे आश्वासन हटकर याने दिले होते. मुदत संपल्यानंतर फिर्यादीने पैसे मागितले असता हटकर याने 3 लाख रुपयांचा धनादेश दिला, मात्र तो बँकेत सादर केल्यावर वटला नाही. त्यानंतर कायदेशीर नोटीस देऊनही हटकर याने रक्कम परत केली नाही. यामुळे फिर्यादीने निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट कलम 138 अंतर्गत इस्लामपूर न्यायालयात दावा दाखल केला होता.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने हटकर यास दोषी ठरवत एक वर्ष कारावास, 4 लाख रुपये दंड व दंड न भरल्यास अतिरिक्त 3 महिने कारावासाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम फिर्यादीस नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले. फिर्यादीतर्फे ॲड. ए. के. गायकवाड यांनी काम पाहिले.