मिरज पंचायत समितीत अधिकाऱ्यांना कोंडले  
सांगली

Miraj News : मिरज पंचायत समितीत अधिकाऱ्यांना कोंडले

सदस्य आक्रमक, प्रचंड गदारोळ; महापुरुषांच्या नामफलकाचा ठराव मंजूर

पुढारी वृत्तसेवा

मिरज : ग्रामस्थांच्या व सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे न देणाऱ्या मिरज पंचायत समितीमधील प्रभारी गटविकास अधिकारी व सहायक गटविकास अधिकारी यांचा निषेध करीत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांनी त्यांना सभागृहातच कोंडून ठेवले. यावेळी पंचायत समितीच्या सभागृहाला व नव्या वास्तूला महापुरुषांची नावे देण्याचा ठराव मंजूर झाला. मात्र श्रेयवादामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये प्रचंड गदारोळ झाला.

मिरज पंचायत समितीच्या नव्या वास्तूला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव व या नव्या वास्तूतील सभागृहाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यासंदर्भात सोमवारी मिरज पंचायत समितीच्या नव्या सभागृहामध्ये विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या सुरुवातीलाच माजी मुख्यमंत्री वसंतदादांचे नाव या सभागृहाला देण्याबाबत ठराव झाला होता, त्याचे काय झाले? असे विचारत काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सदस्य आक्रमक झाले. राष्ट्रपुरुषांच्या नावाला आमच्या कोणत्याही सदस्याचा विरोध नाही, मात्र माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नाव या सभागृहाला देण्यासाठीचा यापूर्वी ठराव मंजूर झालेला असताना, या सभागृहाला दुसरे नाव कसे देण्यात आले? याबाबत प्रशासनाने खुलासा करावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या सदस्या सुजाता पाटील, गायत्री घोरपडे, रिदा मुजावर यांच्यासह अन्य सदस्यांनी उपस्थित केला. त्यानंतर एका बाजूला भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीचे सदस्य आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी, अजित पवार राष्ट्रवादी अशा सदस्यांमध्ये जोरदार हमरीतुमरी झाली.

विशेष सभा ही दोन महापुरुषांच्या ठरावासाठी चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आली आहे. त्यामुळे हा ठराव पहिल्यांदा करा मग अन्य विषयांवर चर्चा करू, असा पवित्रा भाजपचे विष्णू पाटील, पांडुरंग पाटील, संदीप बंडगर यांच्यासह महायुतीच्या सदस्यांनी घेतला. त्यानंतर काही भाजपच्या तर काही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांनी उठून ठराव मांडल्यानंतर सूचक, अनुमोदन देण्याचा आणि श्रेय घेण्याचा प्रयत्न सभागृहामध्ये करण्यात आला. सूचक व अनुमोदन देण्यासाठी सभागृहामध्ये चढाओढ सुरू होती. प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. या गोंधळातच या दोन्ही महापुरुषांची नावे देण्याबाबतचा ठराव एकमताने सर्व सदस्यांच्या अनुमतीने मंजूर करण्यात आला. हा ठराव मंजूर झाल्यानंतर राष्ट्रवादी व काँग्रेसच्या सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. एका महापुरुषाचे नाव १८ दिवसानंतर काढले जाते आणि दुसऱ्या महापुरुषाचे नाव हे लगेच दुसऱ्या दिवशी काढले जाते. याबाबतचा आक्षेप घेऊन सदस्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि कोणती कारवाई करणार हे जाहीर करण्याची मागणी गटविकास अधिकारी किरण सायमोते व सहायक गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके यांच्याकडे केली. मात्र याबाबतच्या प्रश्नावर अधिकारी निरुत्तर राहिले.

याच गोंधळावेळी सभागृहातून सभापती राणी भोरे व भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीचे सर्व सदस्य सभागृहातून त्वरित निघून गेले. हे पदाधिकारी व सदस्य निघून जात असताना दोन्ही गटविकास अधिकारी देखील तेथून निघून जात होते. मात्र तुम्ही आमच्या प्रश्नाचे उत्तर द्या, नागरिकांचे व आमचे समाधान झाल्याशिवाय तुम्हाला या सभागृहातून बाहेर आम्ही सोडणार नाही, असा पवित्रा घेत महिला सदस्यांनी सभागृहाला कडी घातली आणि दोन्ही गटविकास अधिकाऱ्यांना या सभागृहातच सुमारे अर्धा तास कोंडून ठेवले. त्यानंतर काही सदस्यांनी मध्यस्थी केली आणि यासंदर्भातील उत्तरासाठी स्वतंत्रपणे बैठक घेण्याचेही आश्वासन दिले. त्यानंतर या अधिकार्‍यांना या सभागृहातून बाहेर जाऊ दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT