इस्लामपूर : मराठा आरक्षणासाठी शासनाने काढलेला अध्यादेश ओबीसी समाजावर अन्याय करणारा आहे. त्यामुळे हा अध्यादेश तातडीने रद्द करावा. ओबीसी आरक्षणामध्ये इतर समाजाचा समावेश करू नये, या मागणीसाठी वाळवा तालुका ओबीसी समाजाच्यावतीने बुधवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. अध्यादेश रद्द न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करू, असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला. हजारो ओबीसी बांधव मोर्चात सहभागी झाले होते.
मोर्चाची सुरुवात पंचायत समितीपासून क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून झाली. आझाद चौक-लाल चौक- गांधी चौकमार्गे मोर्चा तहसील कार्यालयासमोर दाखल झाला. मोर्चात हजारोंच्या संख्येने ओबीसी समाज बांधव, महिला, युवक सहभागी झाले होते. या मोर्चाचे नेतृत्व समाजातील पाच तरुणींनी केले. त्यांच्याच हस्ते तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, मराठा समाजास वेगळे आरक्षण देण्यास आमचा कोणत्याही प्रकारचा विरोध नाही. त्यांना वेगळे आरक्षण द्यावे; परंतु ओबीसीतून आरक्षण देऊ नये. आमच्या हक्काच्या आरक्षणावर कोणत्याही प्रकारची बाधा येता कामा नये. शासन निर्णय शासनाने तत्काळ मागे घ्यावा. हा शासन निर्णय पूर्णपणे अन्यायकारक, बेकायदेशीर व असंविधानिक आहे. यामुळे ओबीसी समाजाच्या हक्कावर गंभीर परिणाम होणार आहेत. राज्यातील सुमारे 350 हून अधिक जातींना मिळणारे सामाजिक आरक्षण हे चुकीच्या पध्दतीने समावेश केलेल्या लोकांना दिले गेले तर मुळातच सामाजिक मागास असलेल्या ओबीसी समाजाचे शिक्षण व राजकीय क्षेत्रामध्ये प्रतिनिधीत्व कमी होईल. नोकरीमध्ये मिळणार्या संधी कमी होतील. तसे झाले तर प्रस्थापित समूहाला याचा फायदा होईल. मागास बहुजन ओबीसी समाज पुन्हा वंचितच राहील. म्हणून ओबीसी आरक्षणामध्ये इतर कोणत्याही समाजाचा समावेश होऊ नये.
या मोर्चात महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अॅड. चिमण डांगे, कृष्णा कारखान्याचे संचालक अविनाश खरात, काँग्रेसचे सरचिटणीस नंदकुमार कुंभार, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सागर मलगुंडे, माजी नगरसेवक विश्वनाथ डांगे, माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, माजी सभापती जगन्नाथ माळी, माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजी कचरे, सुनीता देशमाने, शुभांगी शेळके, भानुदास विरकर, अजित भांबुरे, शकिल सय्यद, प्रदीप लोहार, शिवाजी वाटेगावकर, शंकरराव चव्हाण, मोहन भिंगार्डे, लक्ष्मण मदने, बजरंग भोसले, उमेश कोळेकर, तानाजी गुरव, अदिनाथ पेठकर, चंद्रशेखर तांदळे, जलाल मुल्ला, संजय लोहार, रस्तुम शिकलगार, गजानन फल्ले, अमोल विरकर यांच्यासह ओबीसी समाजाचे पदाधिकारी सहभागी झाले.