सांगली : सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर व कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातून दुचाकी व मोटारी चोरणार्या अट्टल चोरट्यास सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणने अटक केली. फिरोज नबीलाल मुल्ला (वय 31, रा. जुळेवाडी, ता. तासगाव) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीतील 21 दुचाकी आणि एक मोटार, असा 16 लाख 10 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्याअनुषंगाने छडा लावण्याचे आदेश पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक कल्पना बारावकर यांनी दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे पथक तपास करीत होते. यावेळी, तासगाव तालुक्यातील फिरोज मुल्ला हा अट्टल चोरटा असून त्याने पश्चिम महाराष्ट्रातून दुचाकी चोरल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणला मिळाली होती. तसेच तो चोरलेली दुचाकी पाचवा मैल येथे विक्रीसाठी येणार असल्याची माहितीही मिळाली होती.
सहायक निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकाने पाचवा मैल परिसरात सापळा लावला होता. यावेळी फिरोज मुल्ला हा त्या ठिकाणी आला असता, त्यास पथकाने ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडे विना क्रमांकाची दुचाकी व जुन्या चाव्यांचा जुडगा मिळून आला. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने संंबंधित दुचाकी कुपवाड एमआयडीसीमधून चोरल्याची कबुली दिली. तसेच त्याच्याकडे असलेल्या जुन्या चाव्यांमार्फत त्याने सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातून 21 दुचाकी व एक मोटार चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीतील सर्व वाहने जप्त करण्यात आली आहेत.
बसने जायचा अन् वाहन चोरून परतायचा
फिरोज मुल्ला हा पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटकात बसने प्रवास करायचा. तेथे जाऊन तो दुचाकी चोरून तासगावकडे परतायचा. त्याने दुचाकी चोरण्यासाठी चाव्यांचा वापर केला होता. जुन्या चाव्यांचा जुडगाच त्याच्याकडे मिळून आला आहे.