इस्लामपुरात सराईत गुंडाचा भरदिवसा खून 
सांगली

इस्लामपुरात सराईत गुंडाचा भरदिवसा खून

धारदार शस्त्राने वार; माव्याच्या उधारीचा वाद

पुढारी वृत्तसेवा

इस्लामपूर : येथील सराईत गुंड नितीन संजय पालकर (वय 35) याचा दोघांनी चॉपर व कोयत्याने वार करून खून केला. माव्याच्या उधारीवरून झालेल्या वादातून हा खून झाला. येथील अजिंक्य बझारसमोर गुरुवारी भरदिवसा ही घटना घडली. पालकरवर खुनाचे प्रयत्न, खंडणी, अपहरण, मारामार्‍या असे 13 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला ‘मोका’ही लावला होता. पोलिसांनी रात्री उशिरा दोघा संशयितांना ताब्यात घेतले. यश महेश माने (वय 21, रा. टकलाईनगर, इस्लामपूर) व वैभव दत्तात्रय थोरात (20, रा. मंत्री कॉलनी, इस्लामपूर) अशी संशयितांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली व घटनास्थळी मिळालेली माहिती अशी ः येथील अजिंक्य बझारसमोरील पानटपरीसमोर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पालकर हा मावा नेण्यासाठी आला होता. त्यावेळी पानटपरीचालक यश माने याने, त्याच्याकडे काल नेलेल्या माव्याचे पैसे मागितले. यावरून दोघांत वाद झाला. यावेळी पालकरने पानपट्टीवरील स्कॅनर माने याला फेकून मारला. त्यामुळे चिडलेल्या माने व तेथे असलेल्या वैभव थोरातने चॉपर, कोयत्याने पालकरवर हल्ला चढविला. यावेळी पालकरचा भाचा करण जाधव भांडण सोडविण्यासाठी तेथे आला, तोपर्यंत दोघांनी पालकरच्या डोक्यात, चेहर्‍यावर, पोटावर सपासप वार केले होते.

गुरुवार हा बाजारचा दिवस असल्याने या ठिकाणी मोठी वर्दळ होती. भर रस्त्यात रहदारीच्या ठिकाणी हा हल्ला झाल्याने एकच आरडाओरडा झाला. बाजारासाठी आलेल्या लोकांची पळापळ झाली. आजुबाजूच्या दुकानदारांनी दुकाने पटापट बंद केली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पालकरला इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालयात नेले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, पोलिस निरीक्षक संजय हारुगडे यांनी घटनास्थळी येऊन संशयितांच्या अटकेसाठी पोलिसांना सूचना केल्या. तत्काळ पथके रवाना केली. रात्री उशीरा दोघा हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आले. पालकर व संशयितांत बुधवारी रात्रीही पैशावरून वादावादी झाली होती. त्याच कारणातून ही घटना घडल्याची चर्चा आहे.

पत्नी, मुलांचा आक्रोश

जखमी पालकरला येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले होते. येथे त्याचे नातेवाईक व मित्रमंडळींनी मोठी गर्दी केली होती. पालकरचा मृत्यू झाल्याचे समजताच त्याची पत्नी व लहान मुलांनी एकच आक्रोश केला.

गुन्हेगारी पार्श्वभूमी...

नितीन पालकरवर इस्लामपूर तसेच पेठवडगाव पोलिस ठाण्यात खुनाचे प्रयत्न, अपहरण, खंडणी, शस्त्र बाळगणे, असे 13 गंभीर गुन्हे, तसेच 3 अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत. तो ज्या टोळीत सक्रिय होता, त्या सोन्या शिंदे टोळीला 2019 मध्ये पोलिसांनी मोक्का लावला होता. मोक्कातून बाहेर आल्यानंतरही त्याने गुन्हेगारी कारवाया सुरूच ठेवल्या होत्या. दोन महिन्यांपूर्वी त्याच्यावर खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल झाला होता. दोन दिवस तो नशेत हातात शस्त्र घेऊन शहरात फिरत होता.

भरवस्तीत चौथा खून

अजिंक्य बझार परिसरात यापूर्वी भरदिवसा तीन खून झाले आहेत. गुरुवारी पुन्हा एकदा या गजबजलेल्या ठिकाणीच गुंड पालकरचा खून करण्यात आला. सलग दोन खुनांमुळे इस्लामपूर शहर हादरून गेले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT