कुपवाड : पूर्वी झालेल्या वादातून संजय इंडस्ट्रीयल इस्टेटजवळील अष्टविनायक कॉलनीत रस्त्यावर शुक्रवारी दुपारी 2 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास चौघांनी कोयता, कुकरीसारख्या धारदार शस्त्राने एका सराईत गुन्हेगाराचा खून केला. राहुल सुनील कदम (वय 22, रा. अहिल्यानगर झोपडपट्टी, कुपवाड) असे मृताचे नाव आहे. संजयनगर पोलिसांनी काही तासांतच खून प्रकरणातील सराईत तीन गुन्हेगारांना जेरबंद केले, तसेच एका अल्पवयीन तरुणास ताब्यात घेतले.
निखिल अनिल यादव (वय 21, रा. चिंतामणीनगर, सांगली), रमेश मुकेश जाधव (19, रा. अहिल्यानगर झोपडपट्टी, कुपवाड), विनायक उत्तम सूर्यवंशी (23, रा. अहिल्यानगर झोपडपट्टी, कुपवाड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित विनायक सूर्यवंशी व राहुल कदम मित्र होते. पूर्वी त्या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. शुक्रवारी दुपारी राहुल कदम हा अष्टविनायक कॉलनीतील एका दुकानासमोरील रस्त्यावरून दुचाकीवरून कामावरून घरी जात होता. यावेळी संशयित निखिल यादव, रमेश जाधव, विनायक सूर्यवंशी व एक अल्पवयीन तरुण अशा चौघांनी संगनमत करून राहुल कदम याला रस्त्यात अडवून त्याच्या मानेवर, गळ्यावर, तसेच डोक्यात कोयता व कुकरीसारख्या धारदार शस्त्राने सपासप वार केले. कदम रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडला, त्यानंतर संशयित पसार झाले.
अपर पोलिस अधीक्षक कल्पना बारावकर, सांगलीचे पोलिस उपअधीक्षक संदीप भागवत, मिरजेचे पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, संजयनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश कदम, विश्रामबाग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव, कुपवाड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आनंदराव घाडगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संशयितांकडे चौकशी केली असता, संशयितांनी गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली. संजयनगर पोलिसांनी तिघांना अटक करून कुपवाड पोलिसांच्या ताब्यात दिले.
मृतासह संशयित तिघे सराईत गुन्हेगार
राहुल कदम व संशयित विनायक सूर्यवंशी, निखिल यादव, रमेश जाधव हे तिघेही सराईत गुन्हेगार आहेत. या तिघांच्याविरोधात कुपवाड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.