सांगली ः शहरातील सह्याद्रीनगर येथील मंगळवार बाजार परिसरात सराईत गुन्हेगाराचा पाठलाग करून दगडाने ठेचून व धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. फुलवा ऊर्फ मुबारक हसीऊल्ला शाह (वय 37, रा. प्रकाशनगर, अहिल्यानगर) असे मृताचे नाव आहे.
भरदिवसा दुपारी साडेतीनच्या सुमारास घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली. संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ठसेतज्ज्ञ व श्वानपथकाला पाचारण केले. खुनाची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून सहा ते नऊजणांनी पूर्वीच्या वादातून हा खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.
याबाबत घटनास्थळी मिळालेली व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मुबारक प्रकाशनगर येथे राहण्यास होता. तो भंगार व्यावसायिक होता. सोमवारी दुपारी तो व त्याचा मित्र अजरुद्दीन इनामदार दुचाकीवरून मंगळवार बाजार परिसरातील रिक्षाथांब्याजवळ मावा खाण्यासाठी आले होते. तेथील बाकड्यावर दोघे बसले असता, हल्लेखोर दोन ते तीन दुचाकींवरून तेथे आले. यावेळी हल्लेखोर व मुबारक यांच्यात वाद झाला. हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केला. वार होताच तो पश्चिम बाजूला 80 फुटी रस्त्याने शिंदे मळ्याकडे धावत सुटला. हल्लेखोरांनी दुचाकीवरून त्याचा पाठलाग सुरू केला. एका प्रार्थनास्थळासमोरील बेकरी कारखान्याच्या कॉर्नरला हल्लेखोरांनी त्याला गाठले व त्याच्या डोक्यात धारदार शस्त्राने हल्ला केला. तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्यानंतर हल्लेखोरांपैकी दोघांनी रस्त्यावरील मोठे दगड त्याच्या डोक्यात घातले. त्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले.
घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. खुनाच्या घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक किरण स्वामी व पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह तातडीने शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला. शासकीय रुग्णालय परिसरातही नातेवाईक व मित्रांनी मोठी गर्दी केली होती. उपअधीक्षक विमला एम., स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सतीश शिंदे यांनीही घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.
खुनाच्या घटनेनंतर संजयनगर व एलसीबीच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्हींची तपासणी केली. घटनास्थळापासून जवळच असलेल्या एका बेकरी पदार्थ तयार करणार्या कारखान्यातील सीसीटीव्हीत खुनाची ही घटना कैद झाली आहे. फुलवा पळत असताना ठेच लागून पडला, पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्याला गाठले व त्याच्यावर हल्ला केला, चौघेजण त्याच्यावर हल्ला करीत होते, तर दोघेजण दुचाकी सुरूच ठेवून उभे होते, हल्ल्यानंतर सर्वजण दुचाकीवरून पसार झाल्याचे चित्रण सीसीटीव्हीत दिसून आले.
खुनाच्या घटनेनंतर एलसीबी व संजयनगर पोलिस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण विभागाने हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. पोलिसांची दोन पथके संशयितांच्या मागावर आहेत. पूर्वीच्या वादातून हा खून झाल्याचा संशय असून लवकरच संशयितांना ताब्यात घेतले जाईल, असे संजयनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक किरण स्वामी यांनी सांगितले.
मुबारक हा एका कुख्यात टोळीचा सदस्य होता. त्याच्यावर गुन्हे दाखल होते. तसेच हल्लेखोरही सराईत गुन्हेगार असल्याचे समजते. त्यापैकी एक मोक्कातून नुकताच जामिनावर बाहेर आला आहे. टोळीच्या वादातून हा खून झाला असावा, अशी चर्चा परिसरात होती. त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
हल्लेखोरांनी फुलवाच्या डोक्यात दगड आणि धारदार शस्त्राने हल्ला केला. डोक्यात तीन वार वर्मी बसल्याने तो जागीच ठार झाला. तो खाली पडल्यानंतरही हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात दगड घातले. त्यामुळे डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. घटनास्थळी रक्ताचे थारोळे साचले होते.
पोलिसांनी ठसेतज्ज्ञ व श्वानपथकाला पाचारण केले. श्वानपथकाने घटनास्थळापासून काही अंतरापर्यंत माग काढला. त्यानंतर ते परिसरातच घुटमळले.