मिरज : रेल्वे अर्थसंकल्पात देशभरातील नवीन रेल्वे मार्गांसाठी भरीव निधीची तरतूद केली आहे. परंतु, पुणे-मिरज-लोंढा या रेल्वे मार्गाव्यतिरिक्त सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील नव्या रेल्वे मार्गांना भरीव निधी दिलेला नाही. त्यामुळे कोल्हापूर-वैभववाडी, कराड-चिपळूण आणि हातकणंगले-इचलकरंजी हे रेल्वे मार्ग पुन्हा लांबणीवर पडणार आहेत. राजेवाडी-पुरंदर या नव्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी अर्थसंकल्पात तरतूद केलेली आहे.
पश्चिम महाराष्ट्र कोकणशी जोडण्यासाठी कोल्हापूर-वैभववाडी आणि कराड-चिपळूण या मंजूर असणार्या रेल्वे मार्गांसाठी भरीव अशी तरतूद करणे अपेक्षित होते. परंतु, तसे झालेले नाही. या रेल्वे मार्गांचे सर्वेक्षण होऊन सुमारे पाच वर्षे लोटली, तरी केवळ टोकन अमाऊंटचीच तरतूद केली आहे. पुणे-मिरज-लोंढा या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासह विद्युतीकरणाचा अंतिम टप्पा सुरू आहे. त्यामुळे या कामासाठी रेल्वे अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद केली आहे. परंतु, असे असले तरी मिरज आणि कोल्हापूरमधून नव्या रेल्वे गाड्या सुरू करण्याची प्रवासी संघटनांची मागणी अनेक वर्षांपासूनची आहे. मिरज आणि कोल्हापूरमधून एकही नवी रेल्वे सुरू केलेली नाही. याकडेदेखील रेल्वेने दुर्लक्ष केले आहे. कोल्हापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी आहे. परंतु, ती अनेक दिवसांपासून रेंगाळली आहे.
कोल्हापूर-वैभववाडी, कराड-चिपळूण आणि हातकणंगले-इचलकरंजी रेल्वे मार्ग मंजूर असूनदेखील त्यांना अनेक वर्षांपासून भरीव निधीची तरतूदच केली जात नाही. या रेल्वे मार्गांना भरीव निधीची तरतूद मंजूर झाल्यानंतर रेल्वे मार्गाच्या कामाला सुरुवात होईल. त्यामुळे प्रवासी आणि मालवाहतूक सुलभ होणार आहे.
मिरज जंक्शन हे दक्षिण पश्चिम आणि मध्य रेल्वेला जोडणारे शेवटचे आणि महत्त्वाचे जंक्शन आहे. त्यामुळे हुबळी आणि पुणेपर्यंत धावणार्या एक्स्प्रेस गाड्यांचा मिरजपर्यंत विस्तार करणे गरजेचे आहे. याकडेदेखील दुर्लक्ष झाले आहे.