कडेगाव शहर : आपणास जनतेची सेवा करण्यासाठी नेमले गेले आहे. लोकांच्या हिताची आणि विकासाची कामे करा. कामात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही. अधिकाऱ्यांनी कोणतेही चुकीचे काम केले तर याद राखा, कोणाचीही गय केली जाणार नाही. लोकांवर अन्याय होता कामा नये, तो खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड दम आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिला.
येथे पलूस-कडेगाव तालुक्यांच्या आमसभेत आमदार डॉ. विश्वजित कदम बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, महेंद्र लाड, प्रांताधिकारी रणजित भोसले, तहसीलदार अजित शेलार, डॉ. शांताराम कदम, डॉ. जितेश कदम आदी उपस्थित होते. बैठकीस कदम गटाचे विरोध देशमुख कुटुंबातील कडेपूरचे सरपंच सतीश देशमुख यांनी उपस्थिती लावली. डॉ कदम यांनीही त्यांना सन्मानाने व्यासपीठावर बोलावून घेतले.
यावेळी कडेगाव नगरपंचायतीच्या विकास आराखड्याबाबत नागरिकांच्या प्रश्नांवर डॉ. विश्वजित कदम यांनी मुख्याधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले ते म्हणाले, विकास आराखड्याबाबत नागरिकांच्या हरकती असतील तर तो विकास आराखडा मंजूर होऊ शकत नाही. यावर मुख्याधिकाऱ्यांनी योग्य ती कार्यवाही करावी. शहराच्या विकासासाठी जरूर ते करा, पण चुकीचे कोणतेही काम करू नका, कोणत्याही माणसावर अन्याय झाला तर तो खपवून घेतला जाणार नाही.
वसगडे (ता. पलूस) येथील रेल्वे मार्गावर बांधण्यात आलेल्या उड्डाण पुलाचे लवकरच लोकार्पण केले जाईल. त्यामुळे या मार्गावरील प्रवासी वर्गाची होणारी अडचण दूर होईल. याप्रसंगी पलूस व कडेगाव तालुक्यातील रस्ते, वीज पुरवठा, शेत रस्ते, ताकारी, टेंभूचे पाणी, जलमिशन , रोहयो कामातील विलंब व त्रुटी, शासकीय कार्यालयातील अनागोंदी, एस.टी.चे प्रश्न, बसस्थानकातील स्वच्छतागृहांची दुरवस्था यासह विविध प्रश्नांवर वादळी चर्चा झाली.