आटपाडी : शिक्षकांच्यावर अन्याय होणार नाही आणि गुणवतेशी पण तडजोड करावी लागू नये म्हणून शिक्षकांच्या मागण्यांच्या बाबत सर्व संघटनाशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
आटपाडी येथे सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने सावित्रीदेवी फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार वितरण, समितीचा जिल्हा मेळावा आणि गुणवंतांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. यावेळीआमदार गोपीचंद पडळकर,समितीचे राज्य नेते विश्वनाथ मिरजकर,जिल्हाध्यक्ष माणिकराव पाटील,शिक्षक बँकेचे माजी चेअरमन यु.टी.उदय शिंदे,किरण गायकवाड,सयाजीराव पाटील,राजन सावंत,जगन्नाथ कोळपे व मान्यवर उपस्थित होते.
मंत्री गोरे म्हणाले, सवंग लोकप्रियतेच्या निर्णयामुळे नवीन प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे शिक्षकांच्या मागणी बाबत शिक्षण व्यवस्थेवर परिणाम होणार नाही, असा निर्णय घेतला जाईल. शाळा टीकली तर तुम्ही टिकणार आहात हे शिक्षकांनी लक्षात घेतले पाहिजे.
आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, मंत्र्याचा पोरगा मंत्री आणि आमदाराचा पण पोरगा मंत्री होतो. पण रेशन दुकानदाराचा मुलगा मंत्री झाल्याने विरोधकांना पोटशुळ उठला. जयाभाऊच्या विरोधात षडयंत्र रचले गेले. त्याला ते पुरून उरले. आता बदनामी सहन करणार नाही आम्ही त्यांच्या सोबत आहोत असा त्यांनी इशारा दिला.
ते म्हणाले, देवाभाऊंनी जयाभाऊंची क्षमता बघून त्यांना महत्वाचे मंत्रिपद दिलंय. आता शिक्षक आणि ग्रामपंचायत हे गावगाड्याचे प्रश्न ते सोडवतील अशी मला खात्री आहे.शिक्षकांच्या काही मागण्यांची पूर्तता लवकर झाली पाहिजे. देवाभाऊ आणि जयाभाऊ त्यांचे प्रश्न मार्गी लावतील.
स्वागत माणिकराव पाटील यांनी केले. प्रास्ताविकात यु.टी.जाधव यांनी संचमान्यता, जुनी पेन्शन, अशैक्षणिक कामे, मुख्यालयात राहण्याची अट आणि अन्य मागण्याची पूर्तता करण्याची मागणी केली.