तासगाव : एसटी महामंडळाच्या तासगाव आगारातील सहायक कार्यशाळा अधीक्षक निसार अहमद इब्राहिम नदाफ याने आगारातील कर्मचाऱ्याच्या पत्नीविषयी अश्लील संदेश एसटी महामंडळाच्या अधिकृत ई-मेलवर पाठविल्याप्रकरणी त्याला दोषी धरण्यात आले आहे. एसटीचे प्रादेशिक व्यवस्थापक अमृत शेखर ताम्हणकर यांनी नदाफ याला सेवेतून निलंबित केले आहे.
निलंबित निसार नदाफ याने २२ जून रोजी एसटी महामंडळाच्या अधिकृत मेल आयडीवर तासगाव आगारातील एक कर्मचारी व त्यांच्या पत्नीविषयी अश्लील असा मजकूर लिहून पाठविला होता. हा अश्लील मेल महामंडळाच्या यंत्रणेत प्रसारित झाल्याने संबंधित कुटुंबाची व्यक्तिगत बदनामी झाली होती. तसेच या घटनेमुळे एसटी महामंडळाची प्रतिमा जनमानसात मलिन झाली होती.
आगार प्रमुख नामदेव पतंगे यांनी आपला अहवाल प्रभारी विभाग प्रमुख सुकन्या साठे यांच्याकडे पाठविला होता. नदाफ याचे हे कृत्य पदाला अशोभनीय असून शिस्त व आचरण कार्यपद्धतीचा भंग करणारे आहे, असे नमूद करण्यात आले होते.