ईश्वरपूर : नेर्ले (ता. वाळवा) येथे प्रेमविवाहाचा राग मनात धरून मुलीच्या माहेरच्यांनी सशस्त्र जमाव जमवून विवाहितेचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. नम्रता युवराज माने (वय 19) असे अपहरण झालेल्या विवाहितेचे नाव आहे. या फिल्मी स्टाईल हल्ल्यात विरोध करायला आलेल्या पतीसह सासू आणि दिराला काठ्या व लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली.
याबाबत माहिती अशी, राजेवाडी (ता. आटपाडी) येथील नम्रता आणि नेर्ले येथील युवराज बाळासाहेब माने (वय 40) यांची समाजमाध्यमाद्वारे ओळख झाली होती. तीन महिन्यांपूर्वी त्यांनी प्रेमविवाह केला. मात्र या विवाहाला नम्रताच्या कुटुंबीयांचा तीव्र विरोध होता. मात्र दोन महिन्यांपासून तिचे आई-वडील घरी येऊन विचारपूस करत होते. त्यामुळे वातावरण निवळल्याचे भासत होते. मात्र, गुरुवारी मध्यरात्री 12 च्या सुमारास अचानक तीन वाहनांमधून आलेल्या 10 ते 12 जणांच्या जमावाने माने यांच्या घरावर हल्ला चढवला.
हल्लेखोरांनी सुरुवातीला घराबाहेरील बल्ब काढून अंधार केला. त्यानंतर दुसऱ्या मजल्यावरील युवराजच्या खोलीच्या दरवाजावर गॅस सिलिंडर मारून दरवाजा तोडून आत प्रवेश केला. युवराजला काठीने व लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून त्यांनी नम्रताला जबरदस्तीने ओढत नेले. मध्यरात्री झालेल्या या आरडाओरडीमुळे खाली राहणारा युवराजचा भाऊ धनाजी (वय 35) आणि आई सुमन (65) मदतीसाठी धावून आले. हल्लेखोरांनी त्यांनाही प्लास्टिकच्या खुर्च्या आणि काठ्यांनी मारहाण करून जखमी केले.
याप्रकरणी पती युवराज माने याने कासेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विवाहितेचे वडील आनंदराव दशरथ सातपुते, आई उषा सातपुते (रा. राजेवाडी) यांच्यासह अन्य 14 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कासेगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.