आटपाडी : तालुक्यातील देशमुखवाडी येथील एका तरुणास लग्नाचे आमिष दाखवून एका टोळीने सुमारे दहा लाख रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विवाह पार पडल्यानंतर अवघ्या एका दिवसात नवरीने घरातील रोकड आणि दागिने घेऊन पोबारा केला. याप्रकरणी तरुणाने आटपाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
संबंधित तरुण हा लग्नासाठी मुलीच्या शोधात होता. काही दिवसांपूर्वी आटपाडी बसस्थानक परिसरात त्याची भेट सचिन बाबर याच्याशी झाली. बाबरने त्यांना मुलगी शोधून देण्याचे आश्वासन दिले, मात्र लग्न कोणत्याही गाजावाजा न करता मंदिरात करण्याची अट घातली होती. त्यानुसार, बाबरने वैशाली शेवाळे नावाची तरुणी दाखवली. मुलगी पसंत पडल्याने दोघांचा विवाह निश्चित झाला.
विवाहापूर्वी सोन्याचे दागिने आणि कपड्यांची मोठी खरेदी करण्यात आली. त्यानंतर मासाळवाडी येथील मंदिरात हा विवाह सोहळा पार पडला. हळद, अक्षता आणि देवदर्शन असे सर्व विधी झाल्यानंतर नवदाम्पत्य घरी परतले. मात्र, त्याच रात्री नवरी वैशाली शेवाळे हिने पतीच्या जेवणात गुंगीचे औषध मिसळले.
औषधामुळे पती गाढ झोपेत असताना, वैशालीने कपाटातील अडीच लाख रुपयांची रोकड आणि लग्नासाठी केलेले सोन्या-चांदीचे दागिने असा मोठा ऐवज घेऊन पलायन केले. सकाळी जाग आल्यानंतर नवरी गायब असल्याचे आणि कपाट उघडे असल्याचे पाहून पतीला धक्का बसला. सर्वत्र शोध घेऊनही ती न सापडल्याने त्यांनी अखेर आटपाडी पोलिस ठाण्यात धाव घेतली. सुरुवातीला पत्नी हरवल्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, या प्रकरणात मध्यस्थी करणाऱ्या सचिन बाबर याला पकडून पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.