सांगली : कपाळ भरून ठसठशीत कुंकू, अंगभर लुगडं, हातात डझनभर काकणं... मिरज सिव्हिलच्या दारात झाडाखाली गावाकडची म्हातारी लक्ष्मीबाई तात्यासोबत बसलेली. डोळं पाण्यानं गच्च भरलेलं. भाकर घशाखाली उतरंना. डोंगराएवढा तात्या, पण दोन दिवसात खचून गेला होता. आतनं हादरलावता. दोघांच्या काळजाचा तुकडा कुणीतरी हातोहात लंपास केला होता. अवघ्या तीन दिवसाचा नातू चोरीला गेला होता त्यांचा. पोटात खड्डा पडलावता. रातीचा दिवस करून पोलिसांनी त्यांचं काळीज परत त्यांच्या हातात दिलं खरं, पण डोळ्यातलं पाणी काही थांबत नव्हतं. लेकरू परत आलं वो... म्हणत दोघं एकमेकांना सावरत होती.
डिकळससारख्या मुठीएवढ्या गावातनं लक्ष्मीबाई आणि तुकाराम गोरड पोरीला बाळंतपणाला घेऊन मिरजेत शासकीय रुग्णालयात आले होते. पाच पोरी आणि एकुलता एक पोरगा असलेल्या लक्ष्मीबाईची कविता लाडकी पोरगी. तिला पण दोन पोरं आणि दोन पोरी झालेल्या, पण आईचं काळीज. तिला आपल्या पोरीच्या बाळंतपणाची काळजी लागून राहिलेली. म्हातारी घारीगत पोरीच्या अवतीभोवती थांबलेली. बापाला काळजी दाखवता येत नाही, पण तात्याचं पण खालनं वर आणि वरनं खाली चाललेलं. कविताला पोरगा झाल्याची बातमी आली आणि म्हातारा - म्हातारी जाम?खूश झाली. देवाला हात जोडलं, गावाला पेढं चारायची घाई उठली... तोवर बाळ कुणीतरी चोरल्याचं समजलं आणि दोघांच्या पायाखालची जमीनच सरकली.
आज हे सांगताना पण दोघं हडबडलेलीच होती. लक्ष्मीबाई धीराच्या. त्यांनी सांगितलं, दवाखान्यात समद्या आपल्यागतच आयाबाया. गरिबाच्या. आमी आल्यावर दुसर्या दिशी एक बाय आली. चवकशा कराय लागली. माझ्या बहिणीला पण पोरगं झालंय, काचंत ठिवलया म्हणायली. कविताच्या बाळाला जवळ घ्याला लागली. आता नाय तरी कसं म्हणावं? घेत्या तर घेऊदे. मया असती, असं म्हणालो. रातच्याला बापय माणसास्नी आत झोपू देत नायत, तर मी दोन पोरं घेऊन झोपती, तुमी आत झोपाजा निवांत, म्हणाली. मी नाय गेल्यावर ती बी भाईरच झोपली. सकाळच्याला गाठ पडली, तर एकलीच बसलेली. मालक म्हटलं, तिला बी चार घास दे. दिलं. खाल्ली. भोळी माणसं वो आमी, माणसं वळकाय चुकलो वो.
आमी खाली जेवायला गेल्यावर ही वर पोरीकडं गेली. गप्पा हाणत बसली. जरा येळानं उठली. बाळाला घेतलं आन् ‘सोळा नंबरला डोस द्याला लागल्यात, तुज्याबी बाळाला देऊन आणती’ म्हणाली. मी बी संगट येते, असं पोरगी म्हणाली. पण तू नगो म्हणत ती बाळाला घेऊन गेली की वो. गेली ती परत आलीच नाय. बाळाला घेऊन लंपास झाली की.आमी परत आलो तर कविता कावरीबावरी झाल्याली. विचारल्यावर, बाळाला घेऊन गेल्याली बाई अजून परत आली नाय, म्हणाली. काळजात चर्र झालं. मालकांना सांगितल्यावर ते दाणदाण पळतच सोळा नंबरला गेले, तर बाय बी नाय आन् बाळ बी नाय. मग सारा दंगा उठला. समदा दवाखाना गोळा झाला. बाळ चोरलं बाळ चोरलं...
कवितानं वरडून वरडून दवाखाना डोक्यावर घेतला. माजं बाळ कुठाय विचाराय लागली. काय सांगावं तिला? तास गेला, दोन तास गेलं, एक दिवस गेला, रात गेली. बाळाचं काय समजंना. दोन दिस पोरीनं अन्नाचा कण खाल्ला नाय. समाधान आलदर आमचं जावय हायेत. त्याला निरोप धाडला. त्यो लगोलग आला. त्याला पण काय सुधरंना. आमीच दोघांनी छातीवर दगड ठेवला. डोळं पुसलं आन् पोरीच्या मागं उभा रायलो. आसल दैवात तसं व्हईल, धीर सोडू नगोस म्हणालो. डोळ्याला डोळा नाय, का पोटात अन्नाचा कण नाय. दरवाज्यातच बसलोवतो. सारं पोलिस आलवतं. काय बाय इचारत होतं. दवाखान्यातलं सायेब-मॅडम हलल्या नायत. सारी दवाखान्यात बाळाची वाट बघत बसलेवते. गावाकडची माणसं यायला लागलीवती. नेतेमंडळी येऊन पोलिस-डाक्टरास्नी जाब इचारत होती. आमी पोलिसास्नी सांगितलं, रिकाम्या हातानं गावाकडं जाणार नाय. जाऊन गावाला काय सांगावं आमी? काय बी करा, पर बाळ हुडकून द्या आमचं.
पोलिस कॅमेर्यात कायबाय तपासत हुते. अडीच दिस झालं आन् पोलिस एका बाईचा फोटो घेऊन आलं. आमी लगीच वळीकलं. हीच ती... तिच्या हातात आमचं बाळ हुतं. फुटू बगीतला आन् वाटलं, बाळ सुखरूप हाय. धीर आला. जिवात जीव आल्यागत झालं. देवच पावला... बाळाला घेऊन बाय अंकलीकडं गेल्याचं कळालं. मग ती सारा का फारा सावळज गावची असल्याचं समजलं. पोलिसांनी छापा घालत तिला धरली आन् बाळाला पण सोडीवलं तिच्या तावडीतनं... आन् मग पोलिस मॅडम बाळाला घिऊनच आल्या. बाळ कविताच्या हाताव ठिवलं आन् सोताबी रडायला लागल्या. कवितानं तर हंबरडाच फोडला. पटाटा बाळाचं मुकं घ्यालागली. समदा दवाखाना रडाय लागल्याला... आन् बाळ हसाय लागल्यालं. लबाड लेकाचं.
हे सांगताना दोघंबी हसाय लागले. जाता-जाता तात्या म्हटले, सारा का फारा नावाची बाय ती. आवो त्या बायनं आमच्या कविताच्या दीड वर्साच्या इठ्ठलालाच पळवायचा बेत केलता. पर मी समोरच आल्याव बाई गडबडली. नाय तर बाळाच्या जागी इठ्ठलालाच पळीवलावता तिनं.
कविताचा नवरा, मुंबईवरनं धावत आलेली नणंद, तात्या आणि लक्ष्मीबाई... सारी पोट भरून जेवली. देवागत धावलेल्या पोलिसाना हात जोडलं... पोरीला सोडलं की गावाकडं जायाचं हाये... बारशाची तयारी करायचीय म्हणाय लागले. नाव काय ठेवणार बाळाचं, असं विचारल्यावर तात्या हसले. म्हणाले, ते आता पोलिस मॅडमच ठरीवणार समदं... आमी त्यास्नीच सांगितलंय नावाचं. पर मला इचारशीला तर माझं नाव फिक्स ठरलयं बगा... काय वा..? सत्यविजय. कसं वाटतंया? सत्याचा इजय हुतो म्हणून सत्यविजय. या बारशाला... असं आवतन देत तात्या नातवाकडं जायला निघाले.