सांगली : विरोध पक्षातील व्यक्तींवर आरोप करायचे, त्याला पूर्ण जेरीस आणायचे, मग त्याचा पक्ष प्रवेश घ्यायचा, ही राजकारणाची एक नवी पध्दत सध्या रूढ झाली आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपावर अप्रत्यक्षपणे केला.
शिवसेनेचे नेते सुधाकर बडगुजर व जयश्री मदन पाटील यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्याबद्दल विचारल्यानंतर आमदार जयंत पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, राजकारणात नवी पद्धत रूढ झाल्याचे लोकसुद्धा हे विसरतात. संबंधित एखाद्या पक्षात गेल्यानंतर त्यांच्यावरील आरोपाचाही लोकांना विसर पडतो. मागच्या काळात त्यांनी काय केलं होतं, हे विसरले जाते आणि नवीन इनिंग सुरू होते. प्रत्यक्ष विधानसभेतील भाषणे आहेत. प्रत्यक्ष त्यांना जे प्रवेश देत आहेत, त्यांनीच त्यांच्यावर टीका केलेली असते आणि तेच त्यांचा सत्कार करून हार घालून त्यांना प्रवेश देतात. हे लोकांना कळणे गरजेचे आहे.
श्री. पाटील यांना त्यांच्या भाजपा पक्ष प्रवेशबाबत विचारले असता ते म्हणाले, भाजपा फार मोठा पक्ष झालेला आहे. देशात नाही जगात मोठा झालेला आहे. त्यांच्याकडे इतकी मोठमोठी लोक जात आहेत, त्यामुळे मला गरिबाला का सारखं वेठीस धरता. मी भाजपमध्ये यावे, असं त्यांना वाटतं, हे मीडियावालेच उठवतात. कदाचित त्यांनाही तसं वाटत नसेल. मुख्यमंत्र्यांशी माझ्या भेटी वेगळ्या कारणासाठी होतात. विरोधी पक्षनेता इतर कामासाठी का भेटू शकत नाही. ते थांबवा. इतर कामासाठी भेट घेतलेली असताना तुम्ही पक्षांतरांसाठीच भेटल्याचा गैरसमज करून घेऊ नका.
ते म्हणाले, यशवंतराव चव्हाणांच्यापासून वसंतदादांच्यापर्यंत या कृष्णाकाठची माणसं विचाराला पक्की होती. याच विचारांनी सर्वांनी पुढे जायला पाहिजे होतं, पण आता परिस्थिती बदलली आणि काही वेगळे निर्णय झाले. यावर मी बोलणार नाही. महापुराबाबत ते म्हणाले, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये येणार्या महापुराबाबत अनेक कारणे आहेत. ही कारणे दुरुस्त करण्यात सरकारने लक्ष घातले पाहिजे. पाटबंधारे विभागाने पाण्याचे योग्य नियोजन केले पाहिजे. योग्य वेळी योग्य पाणी खाली सोडले पाहिजे. अलमट्टीच्या उंचीबाबत सांगली-कोल्हापूरमध्ये आंदोलने झाली. या आंदोलकांची भूमिकाही सरकारने समजून घेतली पाहिजे. त्यांचे प्रश्न, त्यांच्या शंका, याला सरकारने उत्तर दिले पाहिजे.
जिल्ह्यातील धर्मांतरावरून सुरू असलेल्या घटनेबाबत विचारले असता पाटील म्हणाले, बळजबरीने धर्म परिवर्तन असेल तर हे गंभीर आहे. त्याला कोणाचाही विरोध असू शकतोच. याचे पुरावे असतील तर पोलिसांनी पुढे आणावेत, पोलिसांनी याबाबत नेमकी माहिती समोर मांडली पाहिजे.