पटेल चौक - सूर्यवंशी प्लॉटमार्गे बायपासकडे या भागातून पर्यायी रस्ता होऊ शकतो.  Pudhari Photo
सांगली

पटेल चौक ते बायपास पर्यायी रस्त्याची गरज

पुढारी वृत्तसेवा

सांगली, पुढारी वृत्तसेवा: बुरूड गल्ली - कर्नाळ रोड पोलिस चौकी ते शिवशंभो चौक बायपास रोड या रस्त्यावरील वाहतुकीची प्रचंड कोंडी पाहता या रस्त्याला पर्यायी रस्ता म्हणून पटेल चौक-सूर्यवंशी प्लॉट ते बायपास रस्त्याची गरज आहे. आमदार, खासदार, महापालिका प्रशासनाने त्यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे. हा पर्यायी रस्ता झाल्यास वाहतुकीची कोंडी होणार नाही. नजीकच्या भविष्यात या रस्त्याची मोठी गरज भासणार आहे.

बायपास चौकातून सांगलीवाडी- इस्लामपूरकडे जाणार रस्ता अतिशय रहदारीचा आहे. मुंबई, पुणे, इस्लामपूरहून येणारी वाहने तसेच जुना कराड रस्ता म्हणजे पलूसकडून वाहने या बायपास रस्त्यावर शिवशंभो चौकात येतात. तिथून सांगलीत येण्यासाठी शिवशंभो चौक - कर्नाळ रोड पोलिस चौकी या मार्गे वाहने पटेल चौकात व तिथून राजवाडा चौकात येतात. या मार्गावर वाहनांची मोठी गर्दी असते. दुचाकी वाहनांपासून ते अवजड ट्रक, बस, टेम्पो आदी वाहतूकही या मार्गावर मोठी आहे.

शहर पोलिस ठाण्यापासून बुरूड गल्ली, कर्नाळ रोड पोलिस चौकी, शिवशंभो चौकातून बायपास रोडवर वाहने जातात. बायपास रोडवरून सांगलीत येणारी वाहने व बायपास रोडकडे जाणारी वाहने एकाच मार्गावरून ये-जा करतात. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या ही नित्याचीच झाली आहे.वाहनचालक, स्थानिक व्यावसायिक, नागरिक या सततच्या वाहतूक कोंडीने वैतागून गेले आहेत. बुरूड गल्लीतून जाणार्‍या रस्त्यावरील अतिक्रमण काढणे गरजेचे आहे. त्याचबरोबर भविष्याचा वेध घेऊन कायमस्वरुपी उपाययोजनाही गरजेची आहे. त्यासाठी पटेल चौक ते सूर्यवंशी प्लॉट ते बायपास रस्ता हा पर्यायी मार्ग होणे ही काळाची गरज आहे.

पटेल चौक ते बायपास या पर्यायी रस्त्याच्या मार्गात येणार्‍या घरांचे पुनर्वसन करणे, त्यांना भरपाई देणे, मार्गातील जागेचे अधिग्रहण करणे यासाठी महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घातले तर शहरातील वाहतुकीची मोठी समस्या दूर होईल.

...तर वाहतूक सुरळीत होणार

सांगलीचा विस्तार होत आहे. व्यापारउदीम, व्यवसाय वाढत आहे. त्याप्रमाणात वाहतूकही वाढत आहे. अशा परिस्थितीत रुंद, चांगले रस्ते ही शहराची प्राधान्याची गरज आहे. पटेल चौक - सूर्यवंशी प्लॉट ते बायपास रस्ता झाल्यास वाहतुकीची कोंडी फुटणार आहे. सांगलीतून बायपास रस्त्यावर जाण्यासाठी स्वतंत्र रस्ता आणि बायपासहून सांगलीकडे येण्यासाठी स्वतंत्र रस्ता, असे दोन एकेरी मार्ग झाल्यास वाहतूक सुटसुटीत, सुरळीत होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT