सांगली : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेत शासनाकडून जमा होणार्या शेतकर्यांच्या शासकीय मदतीवर डल्ला मारून सुमारे 4.50 कोटींचा अपहार झाला होता. याप्रकरणी बॅँकेचे 19 कर्मचारी सेवेतून निलंबित करण्यात आले. त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करून अपहारातील साडेचार कोटींपैकी 2.75 कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. दरम्यान, उर्वरीत रक्कम वसुलीसाठी त्यांच्यावर सहकार न्यायालयात दावे दाखल करण्यात आले आहेत. बँकेकडून वसुलीसाठी जोरदार पाठपुरावा सरू आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर्यांच्या नुकसानीची भरपाई, मदत शासनाकडून वेळोवेळी मिळत असते. ही रक्कम जिल्हा बॅँकेत जमा होते. बॅँक ही रक्कम संबंधित शेतकर्यांच्या खात्यावर वर्ग करते. जिल्हा बॅँकेत शासनाकडून अशा प्रकारे प्राप्त झालेल्या शासकीय मदतीत बॅँकेच्या काही कर्मचार्यांनी अपहार केल्याची घटना गेल्यावर्षी उघडकीस आली होती. वर्षानुवर्षे बंद असलेल्या लाभार्थी शेतकर्यांच्या बॅँक खात्यातील मदतीची बॅँकेकडे पडून असलेली रक्कम काही कर्मचार्यांनी बनावट सही, चलन व धनादेशाद्वारे परस्पर काढल्याचा प्रकार घडला होता. याची गंभीर दखल घेत जिल्हा बॅँकेने चौकशी सुरू केली. तासगाव, निमणी, सिद्धेवाडी, नेलकरंजी, हातनूर, सोन्याळ आदि शाखांमध्ये अपहार समोर आला.
जिल्हा बँकेतील अपहाराबाबत विभागीय सहनिबंधक डॉ. महेश कदम यांनी चौकशीचे आदेश दिले. विशेष लेखा परीक्षक अनिल पैलवान यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पैलवान यांनी ही चौकशी पूर्ण करत आणली असून महिनाभरात याचा अहवाल शासनाला सादर करणार आहेत.
बँकेत अपहार केलेल्या काही कर्मचार्यांनी ही रक्कम मालमत्ता खरेदी करून गुंतवली होती. बँकेने कारवाई करीत या मालमत्तेवर बोजा चढवला आहे. मात्र, अपहारातील एका कर्मचार्याने लाखो रुपयांची उधळपट्टी बँकॉक, पटाया, मलेशिया सहलीवर केली आहे.
कर्मचार्यांनी अपहार केल्याचे उघडकीस आल्यावर संबंधितांवर तातडीने कडक कारवाई सुरू केली. एकाही कर्मचार्यांची हयगय न करता त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली. त्यांच्यावर फौजदारी कारवाईसह खातेनिहाय चौकशी सुरू आहे. या अपहारातील 2.75 कोटी रुपये वसूल झाले आहेत. यातून अपहाराची शासनाची रक्कम शासनाला परत देण्यात आली आहे. बाकी रक्कम वसूल करण्यात येईल.शिवाजीराव वाघ, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा बॅँक