जत : जत नगरपालिकेतील राजकीय रंगमंचावर नाट्यमय घडामोडीला वेग आला आहे. बुधवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट आणि अजित पवार गटाने सर्व मतभेद बाजूला ठेवत एकत्र येण्याची घोषणा केली आहे. संयुक्तपत्रकार परिषदेत अजित पवार गटाचे नेते, माजी आमदार विलासराव जगताप आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते सुरेशराव शिंदे यांनी ही घोषणा करत आघाडीचा अधिकृत फॉर्म्युला जाहीर केला.
नगराध्यक्ष पदासाठी सुरेशराव शिंदे यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली असून, बहुजन समाज पार्टीलाही या आघाडीत सामावून घेण्यात आले आहे. या निवडणुकीत सर्वजण ‘घड्याळ’ या एकाच चिन्हावर लढणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले.
राजकीय ड्राम्याला पूर्णविराम
जत नगरपालिकेची निवडणूक घोषित झाल्यानंतर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीतील युती फिसकटली होती. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी गटांमधील चर्चांना वेग आला आणि अखेर बुधवारी सायंकाळी या चर्चांना पूर्णविराम मिळाला. एकत्र येऊन जतकरांसमोर सक्षम पर्याय उभा करण्याचा निर्धार दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला.
‘शहराचा विकास, गुंडगिरीचा अंत’
सुरेशराव शिंदे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, ‘दोन्ही राष्ट्रवादी गटांनी एकत्र येण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असून, जत शहराने गेल्या 35 वर्षांपासून आमच्यावर विश्वास दाखवला आहे. आता शहराचा सर्वांगीण विकास आणि गुंडगिरीचा अंत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जनता आम्हाला पुन्हा एकदा विजयी करेल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्तकेला.
‘घड्याळ’ चिन्हावर एकसंध लढणार : विलासराव जगताप
माजी आमदार विलासराव जगताप म्हणाले, ‘दोन्ही राष्ट्रवादी गट आणि बसपा एकत्र येऊन ही निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला आहे. बसपाला दिलेल्या जागा वगळता उर्वरित सर्व जागांवर आणि नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार राष्ट्रवादीच्या ‘घड्याळ’ चिन्हावरच निवडणूक लढतील,’ असे त्यांनी स्पष्ट केले.