इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : उरुण इस्लामपूर शहरातील नागरी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी व शहरातील नागरी समस्यांवर ठोस उपाय योजना करण्यास भाग पाडण्यासाठी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज (दि.११) नगरपालिकेवर भव्य धडक मोर्चा काढण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, माजी नगराध्यक्ष अँड.चिमण डांगे, पै.भगवान पाटील, आनंदराव मलगुंडे, माजी उपनगराध्यक्ष दादासो पाटील, खंडेराव जाधव, विश्वनाथ डांगे, अँड.धैर्यशील पाटील, संदिप पाटील, राज्य सरचिटणीस अरुण कांबळे, युवक शहराध्यक्ष सचिन कोळी, माजी नगराध्यक्षा प्रा. अरुणादेवी पाटील, महिला शहराध्यक्ष रोझा किणीकर, प्रियांका साळुंखे, रुपाली जाधव, स्वरुप मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती.
यावेळी शहाजी पाटील म्हणाले की, शहरातील स्वच्छतेचा पुरा बोजवारा उडाला असून शहरातील नागरिकांना अपुरा व अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. शहरातील उद्याने व नाट्यगृहाची दुरावस्था झाली आहे. शहरातील सर्व स्मशानभूमीत वीज व पाणी व्यवस्था कोलमडल्या आहेत. नवीन मैला वारंवार नादुरुस्त होत आहे. घरकुल योजनेतील अनेक मंजूर कामे अपुरी आहेत. या सर्व कामांच्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला.