इस्लामपूर : येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मोर्च्यात सहभागी बैलगाड्या, ट्रॅक्टर, शेतकरी, सरपंच व कार्यकर्ते.  
सांगली

Sangli : ‘रोहयो’चे अनुदान द्या, सात-बारा कोरा करा

इस्लामपुरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा पंचायत समितीवर बैलगाडी, ट्रॅक्टर मोर्चा

पुढारी वृत्तसेवा

इस्लामपूर : राज्य सरकार व प्रशासनाने महात्मा गांधी रोजगार हमी योजना व शेतकर्‍यांच्या विविध अनुदानाचा निधी तातडीने द्यावा, शेतकर्‍यांना कर्जमाफी देऊन सात-बारा कोरा करावा, अन्यथा सरकार आणि प्रशासनाच्या उरात धडकी भरेल असा मोर्चा काढू, असा इशारा वाळवा तालुका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष व माजी मंत्री, आमदार जयंत पाटील समर्थक सरपंच व पदाधिकार्‍यांनी दिला.

शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी वाळवा पंचायत समितीवर बैलगाड्या व ट्रॅक्टरसह भव्य मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, जिल्हा बँकेचे संचालक वैभव शिंदे, नेर्लेचे सरपंच संजय पाटील, इस्लामपूर शहराध्यक्ष शहाजी पाटील, कामेरीचे सरपंच रणजित पाटील यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.

येथील तहसील कचेरी चौकात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून बैलगाड्या व ट्रॅक्टर मोर्चाची सुरुवात झाली. गांधी चौक, संभाजी चौक, आझाद चौक, झरी नाकामार्गे मोर्चा पंचायत समितीसमोर आला. येथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधातील घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसह शेतकर्‍यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेले भाजपाचे आमदार बबनराव लोणीकर व राज्य सरकारचा प्रमुख पदाधिकार्‍यांनी निषेध केला. प्रा. वृषाली पाटील, शंकरराव चव्हाण, हर्षवर्धन पाटील, नागेश कदम, निवृत्ती माळी, शशिकांत पाटील, शिवाजी चोरमुले यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणावर टीका केली.

आंदोलनात राजारामबापू बँकेचे अध्यक्ष विजयराव यादव, उपाध्यक्ष माणिक पाटील, माजी नगरसेवक खंडेराव जाधव, संचालक शैलेश पाटील, बाजार समितीचे सभापती संदीप पाटील, उपसभापती शिवाजी आटुगडे, दिलीपराव वग्याणी, विराज शिंदे, माणिक शेळके, महिला राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षा सुनीता देशमाने, शहराध्यक्षा पुष्पलता खरात, संग्राम जाधव, दिग्विजय पाटील, विठ्ठल पाटील, सुजाता डांगे यांच्यासह गावोगावचे सरपंच, राजारामबापू समूहातील विविध गावांचे संचालक, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT