सांगली : महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी (अजित पवार) काँग्रेसने काही दिवसांपूर्वी मिरजेतील माजी दोन महापौरांसह बारा माजी नगरसेवकांना पक्षात घेतले. त्यानंतर आता सांगलीतही धमाका केला आहे. चार माजी नगरसेवकांनी भाजप व राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी (अजित पवार) काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पुणे येथे पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज दाखल करण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी बाकी असताना, उमेदवारांची पळवापळवी सुरू झाली आहे. त्यामध्ये अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग सुरू केले आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा मिरजेत मेळावा झाला होता. मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मार्गदर्शन केले होते. मेळाव्यात मिरजेतील भाजप, काँग्रेसच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून महापालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले होते.
आता सांगलीतील भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या चार माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामध्ये मागासवर्गीय समितीच्या सभापती स्नेहल सावंत, माजी नगरसेवक अभिजीत भोसले, सचिन सावंत, नसीमा नाईक यांनी प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सर्वांचे स्वागत करत ताकद देण्याची ग्वाही दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
आणखी काही इच्छुक वाटेवर
राष्ट्रवादी काँग्रेसने मिरज आणि सांगलीतील काही माजी नगरसेवकांना पक्षात घेतल्यानंतर आणखी काही इच्छुक उमेदवारांशी खलबते सुरू केली आहेत. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांतील इच्छुकांना घेण्यासाठी चाचणी सुरू आहे.