नवरात्रीचा बट्ट्याबोळ होऊ देणार नाही  Pudhari File Photo
सांगली

नवरात्रीचा बट्ट्याबोळ होऊ देणार नाही

पुढारी वृत्तसेवा

सांगली : पुढारी वृत्तसेवा

गणपती उत्सवाचा चोथा झाला आहे. दांडियाने नवरात्रौत्सवाचा बट्ट्याबोळ केला आहे. हे चालणार नाही. आम्ही नवरात्रीचा बट्ट्याबोळ होऊ देणार नाही, असा स्पष्ट इशारा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी दिला. सर्व सामाजिक कार्यक्रम करमणूक, निवडणूक आणि मिळवणुकीसाठी राबविले जात आहेत, पण दुर्गामाता दौड मात्र एका उद्देशाने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने आयोजित दुर्गामाता दौड प्रारंभप्रसंगी ते बोलत होते.

ते म्हणाले, जगातील 187 पैकी आतापर्यंत 76 राष्ट्रांनी आक्रमणे केलेला बेशर्म लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्थान आहे. 60-65 वर्षांपूर्वी चीनने आपल्यावर आक्रमण केले. युध्द झाले आणि सैनिक मारले गेले. त्यानंतरही ‘हिंदी-चिनी भाई भाई’, अशी घोषणा देणारा पंतप्रधान या देशाला मिळाला, यासारखे दुसरे दुर्दैव नाही. हिंदू-मुस्लिम भाई भाई? शत्रू, वैरी, गनिमांना भाऊ म्हणायचे? हिंदूंना आपला कोण, परका कोण, वैरी कोण, मित्र कोण, योग्य काय, अयोग्य काय हे समजत नाही, असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ज्या देशांनी आपल्यावर आक्रमणे केली, ते आता पाठलाग करीत आहेत आणि आपण पाय लावून पळत आहोत. गणपती उत्सव, नवरात्र उत्सव आता इव्हेंट झाले आहेत. राजकारण, सत्ताकारण, अर्थकारण झूठ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू समाजाला जगाचा बाप व्हायचा मार्ग शिकवला. त्यांच्या विचारांचा भारत करण्यासाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत. जगात सर्वात माया करणारी आईच असते, हे लक्षात घेऊन हे मागणे आम्ही देवीकडे करीत आहोत.

महिलांनी स्वतंत्र दौड काढावी

दुर्गामाता दौडीत सहभागी होण्याची इच्छा माता-भगिनींनाही असणार आहे. पण दुर्गामाता दौडीत पाच वर्षांची मुलगीही चालणार नाही. दौडीचे वाटोळे करू देणार नाही. माता -भगिनींनी स्वतंत्र दुर्गामाता दौड काढावी, असेही भिडे यांनी सांगितले. दुर्गामाता दौडीत पोलिसांनी धावलंच पाहिजे, असेही ते म्हणाले

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT