सांगली : जनतेच्या विश्वासामुळेच देशात २२ राज्यांत 'एनडीए' सत्तेत आहे. केंद्रात काँग्रेसच्या सत्ताकाळात देशाचा विकास धीम्या गतीने, अल्प प्रमाणात झाला आणि भ्रष्टाचार अधिक होता. मात्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कारकीर्दीत देशाचा विकास मोठ्या गतीने आणि भ्रष्टाचारविरहित झाला. त्यामुळे भारताने जागतिक अर्थव्यवस्थेत दहाव्या स्थानावरून चौथ्या स्थानापर्यंत झेप घेतली आहे. मोदी सरकारची बारा वर्षाची कारकीर्द ही आत्मनिर्भर आणि विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने केलेला एक उल्लेखनीय प्रवास आहे, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आठवले शनिवारी सांगली दौऱ्यावर होते. यावेळी 'मोदी सरकारची बारा वर्षे' या विषयावर आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री आठवले म्हणाले, देशाने २०१४ मध्ये नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवला. २०१९ मध्ये त्याहून मोठ्या बहुमताने त्यांना जनतेचा पाठिंबा मिळाला. २०२४ मध्येही निवडून दिले. देश आश्वासनांना नव्हे, तर कामगिरीला महत्त्व देतो. जनतेच्या या विश्वासामुळे आज एनडीए देशात बावीस राज्यांत सत्तेत आहे. सलग तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर प्रधानमंत्री मोदी यांनी सर्वात आधी पीएम किसान सन्मान निधी फाईलवर स्वाक्षरी केली. सरकारसाठी गरीब, शेतकरी, तरुण आणि महिला यांना सर्वोच्च प्राधान्य आहे. आज देशाच्या सीमा आणि अंतर्गत सुरक्षा अत्यंत मजूबत आहेत. सरकारच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळेच देश आज नक्षलवादापासून मुक्त झाला आहे आणि आपला रेड कॉरिडॉर आता ग्रीन ग्रोथ झोनमध्ये रूपांतरित झाला आहे.
स्टँडअप इंडियाअंतर्गत अनुसूचित जाती, जमातीच्या महिला उद्योजकांना १५ हजार कोटी रुपयांहून अधिक रुपयांचे कर्ज दिले. शेतकरी कल्याणाच्या अनेक योजना राबविल्या. गोरगरिबांसह सर्व घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकार काम करत आहे. गरिबांना वैद्यकीय खर्चापासून वाचवण्यासाठी आयुष्मान भारत योजनेंतर्गत ६० कोटींहून अधिक कुटुंबांना आरोग्य कार्ड जारी करण्यात आले आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे ५८ कोटींहून अधिक लोकांना भक्कम सुरक्षा कवच मिळाले आहे.
यावेळी आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, प्रकाश बिरजे, आरपीआयचे (आठवले गट) प्रदेश सचिव जगन्नाथ ठोकळे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष संजय कांबळे, आरपीआय रोजगार आघाडीचे अरुण आठवले, प्रा. शहाजी कांबळे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंधळे उपस्थित होते.