सांगली : ‘गेली 70 वर्षे झाली, आमच्या नांद्रे गावात बहुजन समाजासाठी स्मशानभूमीच नाही. मृतदेह उघड्यावरच जाळले जातात. पावसाळ्यात प्रचंड हाल होतात. मृतदेह जळत असताना अचानक पाऊस आला तर लोकांची धावपळ उडते. आता माझंही मरण जवळ आलय... माझ्यावर तरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार व्हावेत, हीच इच्छा आहे साहेब’, अशी पोटतिडकीची विनंती 78 वर्षांचे वृद्ध ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विलास पिराजी कांबळे करीत होते.
मिरज तालुक्यातील नांद्रे गावात एकच स्मशानभूमी आहे. परंतु मातंग, नवबौद्ध (महार), चर्मकार, धनगर व रामोशी समाजाला मृतदेहावर नदीकाठी उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागतात. त्यामुळे या समाजातील लोकांना त्रास सहन करावा लागतो. गेल्या 70 वर्षांपासून ही स्थिती आहे. पावसाळ्यात मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना खूप अडचणी येतात. मृतदेह जळत असताना पाऊस आला तर लोकांना कुठल्या तरी झाडाचा अडोसा घ्यावा लागतो. पुन्हा सामग्री मिळवून लाकडे पेटवावी लागतात. त्यामुळे वर्षांनुवर्षे या समाजाला हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. यासंदर्भात अनेक वर्षांपासून समाजातील लोक अधिकार्यांकडे निवेदन देऊन पाठपुरावा करीत आहेत. परंतु अद्याप त्यावर अंमलबजावणी झालेली नाही. वरील सर्व समाजासाठी मृतदेह दहन करण्यासाठी येरळा नदीकाठी स्मशानभूमी बांधून द्यावी, अशी आमची मागणी आहे. परंतु त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. आता आमदार सुधीर गाडगीळ, गटविकास अधिकारी व नांद्रे ग्रामपंचायतीला निवेदन दिले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनाही निवेदन दिले आहे. यासंदर्भात तातडीने दखल घेऊन स्मशानभूमी बांधून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
नांद्रे येथील सामाजिक कार्यकर्ते विलास कांबळे म्हणाले, आता माझे वय 78 आहे. गेल्या 70 वर्षांपासून नांद्रे गावात बहुजन समाजासाठी स्मशानभूमीच नाही. पावसाळ्यात प्रचंड हाल होतात. यासंदर्भात वारंवार निवेदने दिली. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. निदान माझ्यावर तरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार व्हावेत, अशी इच्छा आहे. प्रशासनाने याची दखल घेतली नाही, तर जनहित याचिका दाखल करणार आहे.