विटा, पुढारी वृत्तसेवा : सांगली जिल्ह्यातून सुद्धा खाशाबा जाधव यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मल्ल तयार व्हावेत, अशी अपेक्षा जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष नामदेवराव मोहिते यांनी व्यक्त केली. पुण्यात होणाऱ्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी सांगली जिल्हा तालीम संघाच्या निवड चाचणी स्पर्धेस खानापूर (जि.सांगली) येथे शनिवारी (दि.२४) सायंकाळी सुरूवात झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, घाटमाथ्याचे नेतृत्व सुहास शिंदे, प्रा. प्रतापराव शिंदे, आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक उत्तमराव पाटील, जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र शिंदे, रमेश पुजारी, खजिनदार राजाराम पवार बळीराम पवार प्रमुख उपस्थित होते.
मोहिते म्हणाले, राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना १९४३ मध्ये झाली. तेव्हापासून राजाश्रय असलेल्या कुस्तीला राजकीय आश्रय मिळत आहे. परंपरा जपली पाहिजे आणि राजकारणाच्या आखाड्यात कुस्ती क्षेत्राचे नुकसान होऊ नये म्हणून शरद पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वय राखून तोडगा काढला, असेही मोहिते यांनी सांगितले.
या निवड चाचणी मध्ये ५७ किलो,६१ किलो, ६५ किलो,७४ किलो, ७९ किलो, ८६ किलो,९२ किलो,९७ किलो महाराष्ट्र चॅम्पियन पदासाठी आणि खुल्या गटातील महाराष्ट्र केसरीपदासाठी सांगली जिल्ह्यातील तब्बल एक हजाराहून अधिक मल्लांनी सहभाग घेतला आहे. ही निवड चाचणी सर्व वजनी गटातील माती तसेच मॅटवरच्यासाठी होत आहे. आज आणि उद्या (रविवार) या दोन दिवसात होणाऱ्या निवड चाचणीचे संयोजन जिल्हा तालीम संघाच्या वतीने सुहास (नाना) शिंदे युवा मंच खानापूर घाटमाथा, सज्जन बाबर युवा मंच बाणूरगड, महेश जाधव युवा मंच जाधववाडी यांनी केले आहे. प्रारंभी जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष आणि बेणापूर येथील कै.बाळासाहेब शिंदे तालीमेचे वस्ताद राजू तात्या शिंदे यांनी स्वागत प्रास्ताविक केले. यावेळी गणपतराव भोसले, पांडुरंग डोंगरे, सज्जन बाबर, महेश जाधव, दिनकर गायकवाड उपस्थित होते.