सांगली : नागपूरमधील कंपनीकडून पशुखाद्य खरेदी करून कंपनीला तब्बल 81 लाख 46 हजार 296 रुपयांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी संतुलाल जमताणी यांनी सुरेश प्रभाकर पाटील आणि जया सुरेश पाटील (दोघे रा. दत्तनगर, सांगली) यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी संतुलाल जमताणी यांची नागपूरमध्ये साईबाबा नॅचरल्स प्राईव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे. या कंपनीमध्ये पशुखाद्य तयार केले जाते. सुरेश पाटील आणि जया पाटील या दोघांनी सांगलीतील श्री साई फीड सांगली या कंपनीच्या नावे खरेदी केली होती. संतुलाल जमताणी आणि सुरेश पाटील यांची ओळख असल्याने त्यांनी त्यांना वेळोवेळी पशुखाद्य दिले होते. तब्बल 81 लाख 46 हजार 296 रुपयांचे पशुखाद्य पाठविले. परंतु या व्यवहारातील रक्कम देण्यास सुरेश पाटील यांनी टाळाटाळ सुरू केली.
संतुलाल यांनी वेळोवेळी रकमेची मागणी करूनही सुरेश पाटील यांनी रक्कम न दिल्याने फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानुसार त्यांनी दोघांविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.