सांगली : नागपंचमी म्हटले की पूर्वी गावा-गावातील महिलांच्या पारंपरिक खेळांना उधाण यायचे. घरातील कामे बाजूला ठेवून महिला एकत्र येत गाणी म्हणत झिम्मा, फुगडी, फेर धरून विविध खेळ खेळायच्या. गावातील मोठ्या झाडांना दोरखंडाचे झोपाळे बांधले जायचे. मात्र, काळ बदलला तसे नागपंचमीच्या सणातील या पारंपरिक खेळांचे स्वरूपही बदलले आहे.
पूर्वी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात दिसणारे हे खेळ आता मोजक्या ठिकाणीच पाहायला मिळत आहेत. नागपंचमीच्या दिवशी महिला एकत्र येऊन पारंपरिक गाणी म्हणत खेळ खेळण्याची पद्धत होती. झिम्मा, फुगडी, फेर, टिपऱ्या यांसह विविध खेळांमधून महिलांना विरंगुळा मिळत असे. यामुळे महिलांमध्ये स्नेहभाव वाढत असे आणि गावातील सामाजिक एकोपा दृढ होत असे. आता मात्र मोबाईल, दूरचित्रवाणी, बदलती जीवनशैली आणि मनोरंजनाची बदललेली साधने यामुळे या खेळांचे प्रमाण कमी झाले आहे.
झाडांच्या फांद्यांवरील झोपाळे इतिहासजमा
नागपंचमीच्या आधीपासूनच गावातील मोठ्या वड, पिंपळ, आंबा आदी झाडांच्या मजबूत फांद्यांना झोपाळे बांधले जात. मुली, महिला दिवसभर झोपाळ्यावर झोके घेत गाणी म्हणत असत. अनेक ठिकाणी या झोपाळ्यांसाठी विशेष दोरखंड आणले जात. मात्र, आता मोठी झाडे कमी होत आहेत. सुरक्षिततेचे प्रश्न, बदललेली गावांची रचना आणि मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे झाडांवरील झोपाळेही जवळपास गायब झाले आहेत.