सांगली : महापालिकेकडील एका मुकादमावर मित्रानेच किरकोळ कारणातून धारदार हत्याराने हल्ला केल्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास त्रिकोणी बागेजवळ घडला. संदीप यशवंत सिसवरे (वय 40, रा. काळे प्लॉट, रमामातानगर, सांगली) असे जखमी मुकादमाचे नाव आहे. हल्ल्यानंतर जखमी मुकादमास तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
याबाबत शासकीय रुग्णालय व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सिसवरे हे रमामातानगर येथे कुटुंबासह राहतात. ते महापालिकेच्या प्रभाग पंधरामध्ये मुकादम आहेत. मंगळवारी सायंकाळी ते संशयित मित्रासह त्रिकोणी बागेजवळ आले होते. त्यावेळी दोघांमध्ये किरकोळ कारणातून वादावादी झाली. वाद टोकाला गेल्यानंतर संशयिताने त्यांच्यावर धारदार हत्याराने हल्ला केला.
दरम्यान, पोटात वार झाल्याने सिसवरे हे रक्तबंबाळ अवस्थेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कमानीजवळ प्रवासी वाहनाने गेले. त्याठिकाणी काही नागरिकांनी त्यांना जखमी अवस्थेत तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पोटावर वर्मी वार बसल्याने तातडीने उपचार सुरू करण्यात आले. पुढील उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत त्यांची प्रकृती स्थिर होती. विश्रामबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मित्रानेच हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता.