सांगली

सांगली : खंडेराजुरीत लग्नाच्या वरातीत तरुणाचा खून

दिनेश चोरगे

मिरज; पुढारी वृत्तसेवा : खंडेराजुरी (ता. मिरज) येथे लग्नाच्या वरातीत नाचताना तरुणाचा चाकूने भोसकून निर्घृण खून केला. सुमीत जयंत कांबळे (वय 21) असे मृताचे नाव आहे. रविवारी रात्री दहा वाजता ही घटना घडली. रंगपंचमीच्या सणामध्ये रंग लावण्याच्या कारणातून तसेच पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादातून हा खून झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी सूरज आठवले (मूळ गाव खिद्रापूर, जि. कोल्हापूर) याच्यासह अतुल वायदंडे, रणजित ढोबळे व अन्य दोन अल्पवयीन अशा पाचजणांना अटक केली आहे. सुहास वायदंडे आणि आकाश वायदंडे हे दोघे पसार आहेत. सुमित याची भारतीय सैन्यात निवड झाली होती.

याबाबत माहिती अशी की, खंडेराजुरी येथे सुमित धनसरे या तरुणाच्या लग्नाची वरात निघाली होती. या ठिकाणी सुमित कांबळे आला होता. तो वरातीत नाचत होता. याचवेळी त्या ठिकाणी सूरज याच्यासह त्याचे साथीदार देखील आले. रंगपंचमीमध्ये रंग लावण्याच्या कारणातून सुमित आणि सूरज यांच्यात वाद झाला होता. त्यावेळी सूरजने सुमित याला बघून घेण्याची धमकी दिली होती.

वरातीमध्ये रक्तपात

वरातीत नातेवाईकांसह मित्रमंडळी जमली होती. यावेळी वरातीत नाचणार्‍या सुमितचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. एकीकडे जल्लोष सुरू असताना, दुसरीकडे मात्र याच वरातीत रक्तपात सुरू होता. तेथे रक्ताच्या थारोळ्यात सुमित पडल्यानंतर वरातीमध्ये सन्नाटा पसरला.

लष्करात भरती होण्यापूर्वीच मृत्यू

सुमित लष्करात भरतीची परीक्षा उत्तीर्ण झाला होता. काही दिवसात तो वैद्यकीय तपासणीसाठी जाणार होता. त्याआधीच त्याचा खून झाल्यामुळे गावात खळबळ उडाली. सूरजवर खुनीहल्ला, चोर्‍या, दादागिरी असे गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी ग्रामीण पोलिसात सूरज व त्याच्या साथीदाराविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

मूळच्या खिद्रापूरच्या सूरजची खंडेराजुरीत दहशत

मुख्य संशयित सूरज हा कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर येथील आहे. त्याचे खंडेराजुरी हे आजोळ आहे. तो आजोळी राहण्यास होता. मूळच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या सूरजने गावात दहशत निर्माण केली होती.

डीजेच्या दणदणाटामुळे सुमीतचा आवाज आला नाही

वरातीत सूरजने सुमीत याच्याशी रंगपंचमीला झालेल्या वादाबाबत जाब विचारण्यास सुरुवात केली. यावेळी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यानंतर सूरज व त्याच्या साथीदारांनी सुमीतवर वरात सुरू असतानाच चाकूने सपासप वार करण्यास सुरुवात केली. परंतु, डीजेचा दणदणाट सुरू असल्याने सुमीतच्या ओरडण्याचा आवाज कोणासही आला नाही. वार होत असताना सूरजच्या अन्य साथीदारांनी दोघांना घेरले होते. त्यावेळी त्यांचा नाचदेखील सुरू होता. छातीवर वर्मी घाव बसल्याने सुमीत जागीच कोसळला. त्यामुळे वरातीमध्ये एकच खळबळ उडाली. खून झाल्याचे निदर्शनास येताच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सूरजसह संशयितांना ताब्यात घेतले.

SCROLL FOR NEXT